बेवारस स्त्री अर्भक आढळल्याने खळबळ

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 29 जानेवारी 2018

रविवारी पहाटे सहाच्या सुमारास वाघापूर (ता. साक्री) येथील शेतकरी आत्माराम तापीराम कोळेकर (वय 75) यांना शेतातून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जागेवर जाऊन खात्री केली असता त्यांना सुमारे चार ते पाच दिवसाचे नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.

निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील वेहेरगावपासून साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घाटसिंग नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रविवारी (ता. 28) सहाच्या सुमारास नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी पहाटे सहाच्या सुमारास वाघापूर (ता. साक्री) येथील शेतकरी आत्माराम तापीराम कोळेकर (वय 75) यांना शेतातून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जागेवर जाऊन खात्री केली असता त्यांना सुमारे चार ते पाच दिवसाचे नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यानंतर त्यांनी सदर हकीकत गावातीलच राजाराम वाघमोडे, भिला कोळेकर, काशिराम बोरकर, सयाबाई बोरकर आदींना सांगितली. वाघापूर व वेहेरगावात कोणी महिला प्रसूत झाली आहे का याचीही खात्री केली. मात्र कोणीही बालिकेस ओळखले नाही व त्याबाबत काहीही माहिती दिली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पालनपोषण न करण्याच्या हेतूने कायमचा त्याग करून त्या बालिकेस उघडयावर टाकून दिल्याने श्री. कोळेकर यांनी याबाबत ताबडतोब निजामपूर पोलिसांना माहिती देऊन बालकास जैताणे आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तापीराम कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेवारस बालकास टाकून देऊन पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तींविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पाटील घटनेचा पुढील तपास करत आहेत.

आरोग्य विभागाची तत्परता...
संबंधित बेवारस अर्भक जैताणे आरोग्य केंद्रात दाखल झाल्याबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपीन वळवी, डॉ. ललित देसले यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रथमोपचार केले. विशेषतः तेथील आरोग्य सहाय्यिका संगीता शिंदे यांनी बालिकेची संपूर्ण स्वच्छता करून तिच्या अंगावर नवीन वस्त्र चढविले व दूध पाजले. बालिकेचे वजन साधारणतः तीन किलोच्या जवळपास असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी पल्स पोलिओ मोहीम असल्याने सदर बालिकेस रुग्णालयातच पोलिओचा डोसही देण्यात आला. प्रथमोपचारानंतर संबंधित बालिकेस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांची जागरूकता...
कागदोपत्री सोपस्कार पार पडेपर्यंत सदर बालिकेस निजामपूर पोलिस ठाण्यातच ठेवण्यात आले. बालिकेला पाहताक्षणीच तीन महिन्याच्या मुलीची 'आई' असलेल्या तेथील महिला पोलिस कर्मचारी सुरेखा भामरे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी संबंधित मुलीस स्तनपान केले व पोटच्या मुलीप्रमाणे काही तास त्या बेवारस मुलीची काळजी घेतली. त्यांनतर दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास निजामपूर येथून महिला पोलिस कर्मचारी श्रीमती लोखंडे व श्रीमती पावरा यांनी संबंधित बालिकेस जिल्हा रुग्णालयात नेले.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट...
घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा लोया यांनी ताबडतोब आरोग्य केंद्रास भेट दिली व बालिकेच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. "पुरुष अर्भकापेक्षा स्त्री अर्भकाची प्रतिकारशक्ती ही नैसर्गिकरित्याच जास्त असल्याने रात्रीच्या एवढया कडक थंडीतही ही बालिका बचावली. शेवटी देव तारी त्याला कोण मारी?" असे उद्गार यावेळी डॉ. लोया यांनी काढले. तोपर्यंत पोलिसांनी बालिकेचा ताबा घेतला होता. त्यांनी त्वरित निजामपूर पोलिस स्टेशन गाठले व बालिकेच्या प्रकृतीची तपासणी केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, महिला पोलीस कर्मचारी सुरेखा भामरे, ठाणे अंमलदार श्री. कोकणी, श्री. रायते, श्री. चौधरी, आरोग्य विभागाचे कर्मचारी संगीता शिंदे, पी.एन. सोनार, एस.आर. जैन, श्री. बैसाणे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा - 

Web Title: marathi news new born baby girl found