नर्मदालयाच्या भारती ठाकूर यांना "नीलवसंत' पुरस्कार, सोमवारी वितरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नाशिक- येथील नीलवसंत मेडिकल फउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार नर्मदालयाच्या प्रमुख भारती ठाकूर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाशिक- येथील नीलवसंत मेडिकल फउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार नर्मदालयाच्या प्रमुख भारती ठाकूर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाचला गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. माजी मंत्री विनायकदादा पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, "मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमाताई पवार प्रमुख पाहुण्या असतील, अशी माहिती नीलवसंत फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पवार यांनी दिली. 
पंडित कॉलनी येथील लायन्स क्‍लबच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. वसंत खैरनार, विजय कोठारी, रवींद्र मनियार, नारायण थेटे उपस्थित होते. श्री. कोठारी म्हणाले, की नीलवसंत फाउंडेशनतर्फे 2012 पासून दर वर्षी शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक यापैकी एका क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी श्रीमती ठाकूर यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. बाळासाहेब वाघ, नीलिमाताई पवार, प्र. द. कुलकर्णी, वसंत खैरनार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या निवड समितीने ही निवड केली. 

   श्रीमती भारती ठाकूर यांनी दोन मैत्रीणींसह 2005 मध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. पाच महिन्यांत तीन हजार 200 किलोमीटरचा प्रवास केला. या वेळी त्यांनी तिथले दारिद्य्र पाहिले. मुले शेतात काम करताना पाहिली. मुली घरातच लहान भावंडांना सांभाळताना पाहिल्या. महिलांशी संवाद साधला. येथील लेपा परिसरात महेश्‍वर वीजनिर्मिती केंद्र उभारले जात असल्याने 22 गावे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली. काहींना नुकसानभरपाई मिळाली. पुरुषांनी पैसा दारू, जुगार, चैनीच्या वस्तूत घालवला. त्यामुळे शेती नाही, व्यसनाधीनता यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्‍न तेथील महिलांनी मांडला. 

नोकरी सोडून सामाजिक कार्याचा वसा 
श्रीमती ठाकूर यांनी संरक्षण खात्यातील नोकरी सोडून मंडलेश्‍वर गावी दाखल झाल्या. 2009 मध्ये त्यांनी नर्मदालय संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे ठरवले. पहिला वर्ग लेपा गावात सुरू केला. परंतु शिक्षिका मिळत नव्हत्या. सुरवातीला 14 मुलांपासून शाळा सुरू झाली. आता 850 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. 27 शिक्षिका त्यांना शिकवण्याचे काम करत आहे. ही सर्व मुले आजूबाजूच्या आदिवासी पाड्यावरून येतात. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्लंबिंग, गाड्यांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, इलेक्‍ट्रिकल मेन्टेनन्स, वेल्डिंग, ट्रॅक्‍टर दुरुस्ती, शिवणकाम यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मुलांना संगीत, मैदानी खेळ शिकवले जातात. मुलांचा आर्केस्ट्रा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बालशिक्षणाची बीजे रोवण्याचा प्रयत्न केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nilvasant puraskar