बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी कात्रीत

Nandgao
Nandgao

नांदगाव : शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा व फरदड घेऊ नका म्हणून डिसेंबर अखेरीस कापसाचे पीक काढून घ्यावे अशी जाहिरात करायची अन् दुसरीकडे काढून टाकलेली कापसाच्या पिकाच्या पंचनाम्याला नकार द्यायचा अशा दुहेरी कात्रीत तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे. सध्या तालुक्यातील तेरा हजार सहाशे हेक्टरवरील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे मोबाईल अॅपद्वारे जीपीएस इनबिल्ड फोटो काढण्याचे काम सुरु आहे व त्यानुसार नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता तपासली जात आहे. वस्तुस्थिती दर्शक माहिती संकलनासाठी वरकरणी हे पारदर्शी वाटत असले तरी ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकता आहे अशा भागातील कापूस काढून टाकण्याची घाई उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगाशी आली आहे.

तालुक्यातील कळमदरी बोराळे आमोदे व मळगाव या चार बागायतदार गावातील कापूस उत्पादक शासनाच्या निकषामुळे अडचणीत आले असल्याने त्यांच्या काढून टाकलेल्या कापसाच्या नुकसानीचे पंचनामे कधी करणार असा सवाल करीत या भागातील शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांना केला तेव्हा वरून आदेश आल्या शिवाय आम्ही काय करू शकतो असा बचावात्मक पवित्रा या अधिकाऱ्यांना घयावा लागला. गिरणा काठावरची ही गावे बहुतांशी बागायती आहेत मुबलक पाण्यामुळे खरिपातल्या कापसाची चांगल्यापैकी लागवड झाली मात्र शेंदरी बोड अळीमुळे या भागातील जवळपास नऊशे हेक्टर कापसाचे क्षेत्र धोक्यात आले. शेतात जनावरे सोडून काहींनी किडीने ग्रस्त नष्ट करण्याचे प्रयत्न झाले अर्थात शेंदरी अळीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये असा दृष्टिकोन त्यामागे होता. शिवाय शेत स्वच्छ व मोकळे झाले म्हणून व पाण्याच्या मुबलकतेमुळे अन्य पिके घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र हे सर्व करेपर्यंत शासनाचे आदेश निघालेले नव्हते ते सात डिसेंबरला निघाले. या आदेशाप्रमाणे सध्या तालुक्यातील नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे सुरु आहेत. या पंचनाम्यातून बहुतांशी शेतकरी सुटून जात असल्याने नुकसान होऊन पदरात काहीच पडणार नसल्याने शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने अधिकाऱ्यांची आज भेट घेतली.

आमोदे, बोराळे, मळगाव व कळमदरी या चार गावातील कापूस उत्पादक शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश बोरसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शिवसेनेचे विभागप्रमुख अप्पासाहेब पगार, आमोदे येथील सरपंच विठ्ठल पगार, बोराळेचे उपसरपंच राजेंद्र पवार, मळगावचे राहुल आहेर, किशोर सोळुंके, भिकन पगार, पुरुषोत्तम पगार, महेंद्र पगार, शशिकांत जाधव, प्रवीण सोळुंके, शिवाजी सोळुंके, बाळू देवरे, दयाराम आहेर, जयेश देवरे, केतन आहेर, वाल्मिक काकळीज आदी शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com