नाशिक - नगरसेवकांनी महिलांसह काढला हंडा मोर्चा

राजेंद्र बच्छाव
गुरुवार, 1 मार्च 2018

 इंदिरानगर(नाशिक) : प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे गेले वर्षभर पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेवकांनी आज महिलांसह कलानगर चौकात रस्त्यावर उतरत हंडा मोर्चा काढण्याची पूर्ण तयारी केली होती. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 इंदिरानगर(नाशिक) : प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे गेले वर्षभर पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेवकांनी आज महिलांसह कलानगर चौकात रस्त्यावर उतरत हंडा मोर्चा काढण्याची पूर्ण तयारी केली होती. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

रिकामे हंडे आणि थाळ्यांचा दणदणाट सुरु केला. दरम्यान धावत पळत पोचलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत या प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हा तणाव निवळला. या प्रभागात भवानी माथा, चढ्ढा पार्क आणि राणेनगर येथील जलकुंभांवरून पाणी वितरित केले जाते. मात्र गेल्या वर्षापासून  कधी कमी दाबाने, तर कधी अजिबातच पाणी नाही अशा परिस्थितीत येथील पाणीपुरवठा सुरू होता. नागरिकांनी वारंवार नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले मात्र परिस्थिती सुधारत नव्हती.

गेल्या आठ दिवसांपासून पांडवनगरी, श्रद्धा विहार, कलानगर, राजीवनगर, शिवकॉलनी, एकता कॉलनी, राजसारथी, अरुणोदय सोसायटी, मानस सोसायटी, चार्वाक चौक आदी सर्वच ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने स्थानिक नगरसेवक सतीश सोनवणे, अॅड शाम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, माजी नगरसेवक सुनील खोडे, सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज कलानगर येथे शेकडो महिला हंडा मोर्चा काढण्यासाठी जमा झाले.

प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. थेट महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली दरम्यान महापालिकेचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, उपअभियंता रवींद्र धारणकर, संजीव बच्छाव, खाडे, कोथमिरे आदी सर्वच येथे आले आणि त्यांच्यावर महिला आणि नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. उपरोक्त तीनही पाण्याच्या टाक्यात भरत नसल्याने ही समस्या असल्याचे सर्वांनी मान्य केले. मात्र टाक्या भरण्याच्या जबाबदारीवरून सिडको विभाग आणि पूर्व विभाग अशी टोलवाटोलवी सुरू केली. त्यामुळे नगरसेवकांसह सर्वजण संतप्त झाले.

अखेर अधिकारी पातळीवर हे नियोजन करण्याचे सर्वांनी मान्य करत येत्या आठ दिवसांत येथील पाणी पुरवठा सुरळीत करू असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे येथील तणाव निवळला यावेळी भारती बच्छाव, अरूणा पगार, ऋतुजा परब, सुनिता शिरसाठ, उषाबाई कासार, शीतल बडोदे,गौरी रेवगडे, मनिषा पाटील, शुभांगी टक्के, जिजाबाई दोंदे, मैना पगारे, जिजाबाई सोनवणे, शैला शिरसाठ, माणिक मेमाणे, वसंत चिकोडे, किशोर शिरसाठ आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांना देखील निवेदन देण्यात येणार असून त्यांच्यासमोर कैफियत मांडण्यात येणार असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे .    

गेले वर्षभर या प्रश्नावर प्रभाग समिती आणि  महासभेत या विषयाला वाचा फोडली. अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर रंजना भानसी यांच्या समवेत सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या. कागदावर नियोजन झाले मात्र समस्या आहे तेथेच राहिल्याने त्रस्त नागरिकांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेत आज रस्त्यावर उतरावे लागले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र आहे तीच वेळ आल्यास पुन्हा आंदोलन करण्याची तयारी ठेवली आहे, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले. 

Web Title: Marathi news north maharashtra news lack of water supply nashik