आजी माजी आमदारांमध्ये ‘फिक्सिंग’ 

live photo
live photo

पाचोरा ः पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भडगाव तालुक्यात वादळाने झालेल्या नुकसानीच्या कारणावरून टोकाचे आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. ही केवळ जनतेची दिशाभूल असून दोघांमध्ये ‘फिक्सिंग’ आहे. पूतना मावशीच्या प्रेमासारखा हा प्रकार असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. एकमेकांवर आरोप करायचे आणि संगनमताने इतर व्यवहार एकत्र करायचे, अशी दोघांची भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील यांनी केला. 
येथील शासकीय विश्रामगृहात आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साहेबराव पाटील यांनी आजी- माजी आमदारांवर टीकास्त्र सोडले. शहराध्यक्ष ॲड. अमजद पठाण, प्रा. शिवाजी पाटील उपस्थित होते. साहेबराव पाटील म्हणाले, बहुतांश शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळालेली नाही. त्यासाठी आजी- माजी आमदारांनी प्रयत्न अथवा आंदोलने केली नाहीत. निवडणुका पाहून त्यांना शेतकरी आठवत असून दोघेही श्रेयाचे राजकारण करीत आहेत असा आरोप करून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणाऱ्या आजीमाजी आमदारांनी शेतकी संघाची अवस्था पहावी. कोणताही ठराव अथवा संबंधित सहकार विभागाची मान्यता नसताना गाळ्यांची विक्री करण्यात आली आहे. सात कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. प्रत्यक्षात एवढे कर्मचारी तेथे नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताची ही संस्था मरणासन्न अवस्थेत आहे. ही संस्था नेस्तनाबूद करायची आणि शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखवायचा असा प्रकार दोघांचा आहे. बाजार समितीतही तोच प्रकार आहे. माजी आमदार दिलीप वाघ एकीकडे आमदार किशोर पाटलांना फेकू आमदार म्हणतात मग अशा फेकू आमदाराला पालिकेत टेकू का दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकरी संघातील गैरप्रकाराबाबत सहकार विभागाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेत विकासाचे कारण दाखवून दोघे एकत्रित काम करीत आहेत. मग दोघांना शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर दोघांनी मिळून शासन दरबारी प्रयत्न करून शेतकऱ्यांना भरपाईचा व इतर योजनांचा लाभ मिळवून द्यावा. ६०-४० श्रेय त्यांनी घ्यावे, उगीच दिशाभूल करू नये असे सांगून पाचोरा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला काही भाकरी फिरवायच्या आहेत असे वक्तव्य केले आहे. त्यावरून पाचोरा विधानसभेची जागा काँग्रेसला सुटेल, अशी आशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. अमजद पठाण यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com