पोल्ट्रीफार्मसाठी दिलेले 87 लाखांच्या कर्जाची वसुली ठप्प 

प्रशांत बैरागी
मंगळवार, 27 मार्च 2018

नामपूर : ग्रामीण भागात कमी दिवसांत चांगला नफा मिळवून देणाऱ्या कुक्कुटपालन व्यवसायाचे अनेक तरुण शेतकऱ्यांना आकर्षण आहे; परंतु गेल्या काही वर्षांत नामपूर विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून शेतकऱ्यांनी पोल्ट्रीफार्मसाठी घेतलेल्या सुमारे 87 लाख रुपये कर्जाची वसुली ठप्प झाली आहे. 

नामपूर : ग्रामीण भागात कमी दिवसांत चांगला नफा मिळवून देणाऱ्या कुक्कुटपालन व्यवसायाचे अनेक तरुण शेतकऱ्यांना आकर्षण आहे; परंतु गेल्या काही वर्षांत नामपूर विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून शेतकऱ्यांनी पोल्ट्रीफार्मसाठी घेतलेल्या सुमारे 87 लाख रुपये कर्जाची वसुली ठप्प झाली आहे. 
नामपूर विभागात मोसम खोऱ्यातील 55 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. नामपूर, मार्केटयार्ड, आसखेडा, जायखेडा, निताणे, ताहाराबाद, मुल्हेर अशा सात बॅंकेच्या शाखांचा समावेश आहे. बॅंकेच्या शाखांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मध्यम मुदत, अल्पमुदत, पीककर्ज, विहीर बांधणे, फार्महाउस, कुक्कुटपालन उद्योग आदींसाठी कर्जपुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार विभागातील 11 सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून दहा वर्षांत 21 लाभार्थ्यांना सुमारे 87 लाख 77 हजारांचा कर्जपुरवठा केला आहे. पण कर्जाच्या परतफेडीसाठी पोल्ट्रीधारकांनी पाठ फिरविल्यामुळे जिल्हा बॅंक प्रशासनाचा आर्थिक गाडा गाळात रुतला आहे. नामपूर विभागात पोल्ट्रीफॉर्मच्या कर्जवसुलीचे प्रमाण 2 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असून, बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्जाचा एकही हप्ता अद्याप भरलेला नसल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

पाच कोटी थकबाकी 
जिल्हा बॅंकेने 2004 पासून पोल्ट्री व्यावसायिकांसाठी 37.50 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. या कर्जाची वसुलीही चांगल्या प्रमाणात झाली आहे. पण मागील काही वर्षांत घेतलेल्या कर्जाची वसुली मंदावल्यामुळे जिल्हा बॅंकेने पोल्ट्री व्यावसायिकांना दिलेले पाच कोटींचे कर्ज थकीत असून, त्याच्या वसुलीचे मोठे आव्हान आहे. पीककर्जाप्रमाणेच आम्हालाही कर्जमाफी मिळावी, अशी पोल्ट्री उद्योगाची मागणी आहे. 

शेतीपूरक असला, तरी पोल्ट्री व्यवसायात अनेक धोके आहेत. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडते. कर्जमाफी योजनेच्या धर्तीवर शासनाने कृषीपूरक उद्योगांनाही कर्जात सूट द्यावी. 
- सागर पाटील, पोल्ट्री व्यावसायिक, नामपूर 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जवसुली मोहीम जोमाने सुरू आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून पोल्ट्रीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची बॅंकेला माहिती नाही. बॅंकेच्या हितासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी सहकार्य करावे. 
- राजेंद्र भामरे, विभागीय अधिकारी, जिल्हा बॅंक, नामपूर 

आकडे बोलतात... 
विभागनिहाय पोल्ट्रीफार्म कर्ज 
विभाग सभासद थकबाकी 

* नामपूर 13 59,43,187 
* मार्केटयार्ड 4 14,43,205 
* आसखेडा 3 9,86,549 
* जायखेडा 1 4,05,000 
एकूण 21 87,77,941 
 

Web Title: MARATHI NEWS POULTRY FORM