esakal | धुळे जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात दुप्पटीने वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यासाठी तयारी सुरू आहे. विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याने हरभरा आणि गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बीतील कोळपणी सुरू आहे.

धुळे जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात दुप्पटीने वाढ 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने सलग तीन महिने हजेरी लावली. नदीनाल्यांना पूर आले. लहानमोठ्यांसह सर्वच धरणे तुडुंब भरून ओसंडलेत. रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यासाठी तयारी सुरू आहे. विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याने हरभरा आणि गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बीतील कोळपणी सुरू आहे. यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. 

सर्वच धरणे, प्रकल्प तुडुंब 
जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, वाडी शेवाडी, अमरावती, सुलवाडे, धुळे मध्यम प्रकल्प, मुकटी आदी प्रकल्प व धरणे तुडूंब भरले आहेत. यांचे पाणी रब्बीसाठी दिले जाते. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सध्या पहिले आवर्तन देण्यासाठी पाटबंधारे विभागाची तयारी सुरू झाल्याचे समजते. 

रब्बीच्या क्षेत्रात वाढ 
जिल्ह्यातील जलसाठ्यात विक्रमी जलसंचय आहे. कूपनलिका व विहिरींची पाणी पातळीही मोठी वाढली आहे. रब्बीतील गहू, हरभरा, बाजरी आणि ज्वारीच्या पेऱ्यात यावर्षी अधिकची वाढ झाली आहे. रब्बीचे क्षेत्र दुप्पटीने वाढणार आहे. कूपनलिका आणि विहिरीच्या पाण्यावरचा रब्बीचा पेरा ऑक्टोबायमध्येच पूर्ण झाला आहे. गहू हरभऱ्या‍ची पिके चांगलीच तरारली आहे. थंडीमुळे जोरकस वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी कोळपणीची कामेही सुरू केली आहेत. कोळपणीसाठी बैलजोडीच्या औतासाठी हजार भाडे आहे. माणसाची रोजंदारी दोनशे आहे. 
 
यावर्षी पाण्याचा साठा अधिक आहे. गहू आणि हरभऱ्या‍ला बऱ्यापैकी भाव असतो. हे पीक हमीची उत्पादन देते. साठवताही येते. त्यामुळे यांच्या क्षेत्रात वाढ केली आहे. 
-बन्सिलाल माळी, बागायतदार शेतकरी 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image