esakal | Video : सिग्नल अभावी अडकल्या रेल्वे गाड्या; प्रवाशांची उपासमार 
sakal

बोलून बातमी शोधा

railway station

केंद्र शासनाने रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे रेल्वेत अद्यापही पुरेशे कर्मचारी कामावर येऊ शकत नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत अडचणी निर्माण होत आहे.

Video : सिग्नल अभावी अडकल्या रेल्वे गाड्या; प्रवाशांची उपासमार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : लॉकडाऊनमुळे देशातील महानगरांमध्ये अडकलेल्या मजूरांना आपापल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक एक्स्प्रेस गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, भुसावळ ते इटारसी दरम्यान, मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे २६ रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या. मुंबईून लखनऊसाठी निघालेल्या दोन रेल्वे गाड्या आज सकाळी ९ वाजता सावदा आणि निंभोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे खाण्या-पिण्याचे हाल झाले, यादरम्यान रावेरसह निंभोरा, गाते (ता. रावेर) ग्रामस्थांनी प्रवाशांसाठी खाण्या-पिण्याची सुविधा केल्याने काहीसा दिलासा मिळाला. 

केंद्र शासनाने रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे रेल्वेत अद्यापही पुरेशे कर्मचारी कामावर येऊ शकत नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत अडचणी निर्माण होत आहे. गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने सकाळी आठ वाजेपासून भुसावळ ते इटारसी दरम्यान, गाड्या थांबविण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वे वाहतुक सुरळीत होऊ शकली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. खाण्या-पिण्याची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांच्या जीवाची अतिशय तगमग झाली. त्यामुळे रेल्वे मार्गाशेजारील ग्रामस्थांनी प्रवाशांना खाद्यपदार्थांसह पाण्याची व्यवस्था करुन दिली. सावदा रेल्वे स्थानकावर गाते (ता. रावेर) ग्रामस्थांनी चिखडी तयार करुन, या प्रवाशांना वाटप केली. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. सरपंच सुनिता कोळी, मनोज वाघ, माजी सरपंच सदाशिव झांबरे यांसह ग्रामस्थांनी सहकार्य केले. 

रावेरला केळी वाटप 
रावेर : बोरिवली येथून उत्तर भारतात निघालेली श्रमिक एक्सप्रेस आज सकाळी आठला वाजता रावेर रेल्वे स्थानकावर अचानक थांबली. पुढे प्रवासाला तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. ही गाडी दुपारी दोनपर्यंत येथील स्थानकात उभीच होती. हे वृत्त सकाळी दहाच्या सुमारास समजताच शहरातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर महाजन, नीलेश लोहार, संतोष महाजन, अभिजित लोणारी, भोईवाडा लेझीम मंडळ, अजिंक्य वाणी, अंबिका व्यायाम शाळेचे कार्यकर्ते यांच्यासह आदी तिथे पोचले आणि पिण्याच्या पाण्याचे सुमारे दीडशे जार आणि टँकर तसेच अल्पोपहार म्हणून केळीची व्यवस्था केली.