जास्त हिरवळ, माती मिश्रणामुळे खेळपट्टीचा दोन्ही संघांना फायदा 

residentional photo
residentional photo

नाशिकः कसोटी असो की वन-डे, सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविले जाणार असले, तरी खेळपट्टीवरील हिरवळीच्या जोडीला मोठ्या प्रमाणावर मुरमाचा वापर केला जातो. किंबहुना ही खेळपट्टी गोलंदाजी, फलंदाजीसाठी साथ देणारी ठरत नाही. त्या तुलनेत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील खेळपट्टीवर हिरवळीचे प्रमाण जास्त आहे. शिवाय मैदानावर चिकन लालसर मातीचेही प्रमाण पुरेसे आहे. येथील वाढत्या थंडीमुळे खेळपट्टीवर दवाचे प्रमाण अधिक राहील. त्याचा फायदा दोन्ही संघांना उठवता येईल, असे मत मैदानाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

नाशिकच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारण्याबरोबरच फलंदाजीलाही ती साथ देणारी आतापर्यंत ठरली आहे. त्यामुळे ही खेळपट्टी कायम चर्चेत राहिली आहे. गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून ही खेळपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. दर वेळेस सामन्याच्या अगोदर महाराष्ट्राचे क्‍युरेटर येतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सारे काम चालते. यंदा मात्र बीसीबीआयने आपल्या नियमात बरेच बदल केले असून, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी क्‍युरेटर म्हणून रमेश म्हामुनकर यांना नाशिकला धाडले आहे. याशिवाय ज्येष्ठ संघटक, प्रशिक्षक रतन कुयटे व इतर स्थानिकांच्या मदतीने या खेळपट्टीचे दिवसभर काम चालते. ही खेळपट्टी बुधवार(ता. 12) दुपारपर्यंत तयार होईल, असे तज्ज्ञांना वाटते. 

लोढा समिती, बीसीसीआयचा फटका

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे पदाधिकारी विनोद (धनपाल) शहा "सकाळ'शी बोलताना म्हणाले, की रणजी सामना निश्‍चित झाल्यापासून निधीची उणीव यापूर्वी कधीही भासली नाही, पण यंदा लोढा समिती व बीसीसीआयने आर्थिक निकषांत मोठ्या प्रमाणावर बदल केले. त्यामुळे निधीची मोठी उणीव भासली, पण नाशिककरांसाठी कुठल्याही परिस्थितीत खंड पडू न देता रणजी सामना घ्यायचाच, असा आम्ही चंग बांधला. निधीची चणचण लक्षात घेऊन नव्याने सभासद मोहीम (मेंबरशिप ड्राइव्ह) राबवत पैसे जमा केले. याशिवाय स्थानिक आमदार, खासदारांच्या निधीतून मोठी मदत झाली. त्यामुळे रणजी सामन्याच्या नियोजनाचे शिवधनुष्य पेलले. रणजीसाठी भारतीय, आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा समावेश असतो. या खेळाडूंचा खेळ पाहूनच नाशिकच्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळते. ते पुढे आपले करिअर करू शकतात, हे लक्षात घेऊन हा सामना घेतला जातो. सत्यजित बच्छाव, मुर्तझा ट्रंकवाला यांनी 2005 मध्ये नीलेश कुलकर्णी, मुरली विजय यांचा खेळ पाहूनच आपल्या करिअरची सुरवात केली. त्यामुळे उदयोन्मुख क्रिकेटपटू हे सामना पाहतात आणि त्याप्रमाणे आपले करिअर घडवतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे. 

सामन्याचा आनंद घ्या विनामूल्य 
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवार(ता. 14)पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र ही लढत सुरू होत असून, या सामन्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क ठेवण्यात आलेले नाही. नाशिककर क्रीडारसिकांना सामन्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल. जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विनोद (धनपाल) शहा, सचिव समीर रकटे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. 

महात्मानगरच्या नव्या  पॅव्हेलियनचे शनिवारी उद्‌घाटन 

महात्मानगर मैदानावरसुद्धा जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सामन्यांबरोबरच सरावही केला जातो. याठिकाणी आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदारनिधीतून नवे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 15) भारतीय संघात स्थान मिळविलेला रणजीपटू केदार जाधव याच्या हस्ते होईल. 

संभाव्य महाराष्ट्र संघ 
ेअंकित बावणे (कर्णधार), स्वप्नील गुगळे, जय पांडे, केदार जाधव, राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), चिराग खुराना, नौशाद शेख, रोहित मोटवानी (यष्टिरक्षक), अक्षय पालकर, सत्यजित बच्छाव, अनुपम संकलेचा, समेद फल्लाह, मंदार भंडारी, अक्षय दरेकर, निखिल धुमाळ. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com