जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक 

जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक 

जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर 
जळगावकर आक्रमक 

जळगाव : "अमृत' योजनेमुळे खोदलेले रस्ते, प्रमुख रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत असून, दोन दिवसांत या खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतला. त्यामुळे याप्रश्‍नी आता जळगावकर आक्रमक झाले आहेत. याविरोधात तीव्र जनआंदोलनासह आयुक्त, पोलिस अधीक्षकांना पत्र देण्यासह जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा निर्धार विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत आज करण्यात आला. 

शहरातील खड्ड्यांमुळे शनिवारी झालेल्या अपघातात उद्योजक अनिल बोरोले यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सभा झाली, त्यानंतर शहरातील या गंभीर समस्यांबाबत विस्तृत चर्चा झाली. रोटरी, लेवा पाटीदार संघ यासह विविध संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या चर्चेत सहभागी झाले होते. 

रस्त्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक 
या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्‍नावर आक्रमकपणे मत मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आर्थिक स्थितीच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची कामे होत नाही. अनेकदा रस्त्यांमधील खड्ड्यांच्या प्रश्‍नावर आंदोलने झाली, महापालिकेला निवेदन देण्यात आले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे महापालिका यंत्रणेबद्दल यावेळी तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. 

जनआंदोलन छेडणार 
या गंभीर समस्यांवर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नसल्याने याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यात उद्या (ता. 17) महापालिका आयुक्तांना रस्त्यांमधील खड्ड्यांच्या प्रश्‍नी निवेदन देण्यात येणार आहे. नंतर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल. 

अवजड वाहतुकीला जबाबदार कोण? 
शनिवारी उद्योजक अनिल बोरोले यांचा अपघात झाला. मात्र, शहरात दिवसाच्या वेळी अवजड वाहतुकीस बंद असताना भरधाव वेगात आयशर ट्रक कशी आली? वाहतूक पोलिस त्यावेळी काय करत होते? त्यांनी या ट्रकला का अडविले नाही? याला जबाबदार कोण? असे प्रश्‍नही उपस्थित करण्यात आले. त्यासाठी आता पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. 

जनहित याचिका दाखल करणार 
शहरातील रस्त्यांमधील खड्डे, "अमृत' योजनेच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. रस्ता खोदल्यानंतर जी यंत्रणा ते काम करते, ती आधीच महापालिकेकडे त्या रस्त्याच्या कामासाठी निधी जमा करते; परंतु तो निधी इतरत्र वापरला जातो. मग, ही जबाबदारी महापालिका का स्वीकारत नाही? असा प्रश्‍न उपस्थित करत शहरातील रस्त्यांच्या या अवस्थेबाबत कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचेही ठरले. 

रोटरी बुजणार खड्डे 
जनहित याचिका, जनआंदोलनासोबतच सामाजिक, सेवाभावी संस्थांनीही रस्त्यातील खड्डे बुजण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मतही समोर आले. रोटरीचे सध्या शहरात सात विविध क्‍लब आहेत, त्या सर्व क्‍लबने ठराविक रस्त्यांची जबाबदारी घेऊन त्यातील खड्डे बुजवावे, असे मत डॉ. राजेश पाटील यांनी मांडले. गनी मेमन, किशोर सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, चंदन कोल्हे, दीपक गुप्ता, सूरज जहांगीर, विनोद बियाणी यांच्यासह अनेकांनी यावेळी सूचना केल्या. 

"त्या' चौकाला बोरोलेंचे नाव 
ज्या चौकात अनिल बोरोले यांचा अपघात होऊन दुर्दैवी अंत झाला त्या चौकाला किंवा रस्त्याला श्री. बोरोले यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना मांडण्यात आली. ती मान्य करण्यात येऊन, त्यासंबंधी पत्र महापालिकेस देण्यात येणार आहे. 

शहरात 850 अनधिकृत गतिरोधक 
शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी अनधिकृत गतिरोधक आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो. हे सर्व गतिरोधक नियमानुसार नसून त्यांचा आकार, रचना व ठिकाणेही चुकीची आहेत. अशी 850 पेक्षा अधिक अनधिकृत गतिरोधक असल्याची माहिती यावेळी दीपक गुप्ता यांनी दिली. 

24 जीवघेणे खड्डे 
शहरातील प्रमुख रस्त्यांवर 24 ठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. गेल्यावर्षी रेडक्रॉस संस्थेने हे खड्डे शोधले होते. त्यानंतर महापालिकेत दोन आयुक्त बदलून गेले, हे तिसरे आयुक्त आहेत. वर्ष- दीड वर्षात यापैकी एकही खड्डा बुजविण्यात आलेला नाही, ही महापालिकेसाठी नामुष्कीची बाब असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com