आठवड्याभरात केळी भावात घसरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

रावेर ः केळीची बाजारपेठ किती बेभरवशाची असते, याचा अनुभव केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत. चारच दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने केळीला वर्षभरातील उच्चांकी भाव मिळाला होता. आता हजार- नऊशे रुपयांत देखील कोणी व्यापारी लवकर घ्यायला तयार नाही. रमजानचा संपत आलेला महिना, त्यातच पुन्हा वाढलेले तापमान, कापणीयोग्य केळीचे वाढलेले प्रमाण यामुळे आठवडाभरात केळीची मागणी आणि त्यासोबतच भावही वेगाने कमी झाले आहेत. आगामी आठवडाभरात केळीची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. घसरलेले भाव आणि कमी झालेली मागणी यामुळे ऐन उन्हाळ्यात केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. 

तीन चार दिवसांपूर्वी (२२ मे रोजी) केळीच्या भावाने चौदाशे दहा रुपये क्विंटल भाव घेऊन उच्चांक गाठला होता. मात्र, उद्या (ता. २७) साठी बाजार समितीने केळीचे भाव १२०० रुपये फरक १४ रुपये असे एकूण १२७४ रुपये जाहीर केले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हे भाव सुमारे सव्वाशे-दीडशे रुपये कमी आहेत. याबाबत माहिती घेतली असता व्यापाऱ्यांनी सांगितले की, बऱ्हाणपूर आणि रावेर येथे आलेले उत्तर भारतातील केळीचे व्यापारी ईद साजरी करण्यासाठी आपापल्या गावी निघून गेले आहेत. आता केळी खरेदी करून बाजारपेठेत पोहोचेपर्यंत आणि पिकेपर्यंत ईद झालेली असेल म्हणून केळीची मागणी अचानक कमी झाली आहे. त्यातच बाजारपेठेत आंब्याची वाढलेली आवक, तुलनेने कमी झालेले भाव, केळीची उत्तर भारतात वाहतूक करताना अति उष्णतेमुळे होत असलेले केळीचे नुकसान आणि कापणी योग्य केळीच्या प्रमाणात झालेली मोठी वाढ या सर्वांचा परिणाम केळी भावावर होताना दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून तापमान ४० ते ४२ अंशाच्या कमी होत नसल्याने कापणी योग्य केळीच्या दर्जावरही त्याचा परिणाम झाला आहे. आज तालुक्यात जादा रक्कम देऊन तर सोडाच पण बाजार समितीच्या भावात देखील कोणीही व्यापारी केळी खरेदी करायला तयार नाही. ईद संपेपर्यंत म्हणजे आठवडाभर ही परिस्थिती कायम राहणार आहे. 

बऱ्हाणपूरला २०० ट्रक्स केळीचा लिलाव 
रावेर तालुक्यात आज आठशे ते अकराशे रुपये असा केळीचा भाव होता. या कमी भावात विनंती करूनही व्यापारी शेतकऱ्यांची केळी खरेदी करण्यासाठी तयार नव्हते अशी परिस्थिती आहे. ४४ ते ४५ डिग्री तापमानात कापणी योग्य केळी बागेत आठ दिवस सांभाळून ठेवणे शेतकऱ्यांना अवघड होणार आहे. केळी बागेत कापणी योग्य माल साचत जाऊन भाव आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोज ४०० ट्रक्स केळीची खरेदी विक्री होणाऱ्या बऱ्हाणपूर बाजार समितीत आज जेमतेम २०० ट्रक्स केळीचा लिलाव झाला. आणि सर्वोच्च भावही बाराशे रुपये मिळाला. तिथे मागील आठवड्यात सर्वोच्च भाव सतराशे रुपयांपर्यंत गेले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver banana rate down