केळीलाही हवी आता आधारभूत किमत! 

banana
banana

रावेर. सध्या बाजारपेठेत व्यापारी बांधवांकडून केळीला नगण्य भाव मिळत आहे. उत्पादकांचा हा केळी भावाचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्याच्या पणन मंत्रालयाने केळीबाबतचा अधिक अभ्यास करून केळीची आधारभूत किंमत ठरवून द्यावी, अशी मागणी आता केळी उत्पादकांकडून होत आहे. ही आधारभूत किंमत ठरवत असताना पुरवठा साखळीतील कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. 

केळीला मातीमोल भाव 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केळी मातीमोल भावात विकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. सामान्यपणे केळीला सध्या ४०० रुपये क्विंटलचा भाव मिळत असून, काही ठिकाणी दोनशे ते अडीचशे रुपये क्विंटलनेही केळीची विक्री शेतकरी नाइलाजाने करीत आहेत. बाजारपेठेतील पिकलेल्या केळीचे भाव पाहता व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांना किमान आठशे रुपये क्विंटल भाव उपलब्ध करून द्यावेत व शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करावी, अशीही अपेक्षा केळी उत्पादकांकडून व्यक्त होत आहे. 
सध्या केळीची खरेदी चार रुपये किलोने सुरू आहे. केळीची वाहतूक, हमाली, केळी पिकवण्याचा खर्च आणि सर्व मध्यस्थांचा नफा धरून केळी ग्राहकापर्यंत जाते तेव्हा ती २० ते २५ रुपये किलोने विकली जाते. चार रुपये किलोमध्ये केळी उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. तो भरून निघण्यासाठी किमान आठ रुपये किलो भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. 

बाजार समितीच्या दराप्रमाणे खरेदी व्हावी 
दरम्यान, केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केळीची बाजार समितीने ठरवून दिलेल्या भावातच खरेदी करावी, असा ठराव आज येथील बाजार समितीत केला. आज दुपारी येथे बाजार समितीत सभापती श्रीकांत महाजन यांचे अध्यक्षतेखाली समितीचे संचालक व केळी भाव निश्चित करणाऱ्या समितीची बैठक झाली. राजीव पाटील, पीतांबर पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, प्रमोद धनके, गोपाळ नेमाडे, केळीभाव समितीचे रामदास पाटील, दत्तू महाजन, वैभव महाजन, संजय अग्रवाल व समितीचे सचिव गोपाळ महाजन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. लॉकडाउनच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन बाजार समितीच्या बैठकीत केले. २२ ते २७ मार्च दरम्यान उत्तर भारतात केळी वाहतूक पुर्ण बंद होती. आता ती सुरू झाली असून, बाजार समितीने शेतकरी व व्यापारी या दोघांचा विचार करून भाव निश्चित केले आहेत. व्यापाऱ्यांनी सहानुभूतीने विचार करून ठरलेल्या भावातच केळी खरेदी करण्याचे आवाहन बैठकीत केले. उद्या (ता. ३) साठी केळीचे नवती ६०० रुपये फरक १०, पिलबाग ५०० रुपये फरक १०, वापसी २०० रुपये क्विंटल असे भाव जाहीर केले. 

सावदा येथे आज बैठक 
केळीच्या घसरलेल्या भावाबाबत विचार विनिमय करण्यासाठी उद्या (ता. ३) सावदा येथे विश्रामगृहावर केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी, जिल्हा साहाय्यक निबंधक, जिल्हा कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक विचार विनिमयासाठी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी ‘सकाळ'ला दिली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार ही बैठक बोलवण्यात आली आहे. आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com