आखाती देशांमध्ये केळीला मागणी कायम! 

banana
banana

रावेर : जगभर कोरोना व्हायरसने प्रचंड गोंधळ उडविला असला तरीही महाराष्ट्रातील आणि जळगाव जिल्ह्यातील केळीच्या मागणीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून आजही नियमितपणे केळीची निर्यात आखाती देशांमध्ये सुरू आहे. मार्चच्या २०/२२ तारखेपासून जिल्ह्यातील निर्यातीलाही वेग येणार आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. 

केळी निर्यातीवर कोरोना व्हायरसचा परिणाम होत असल्याच्या अफवा समाज प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. पाटील यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. श्री. पाटील म्हणाले की, आंध्रप्रदेशातील निर्यातक्षम केळी आता संपण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर आणि यावल तसेच मध्य प्रदेशातील बडवानी आणि बऱ्हाणपूर याच तालुक्यांमध्ये आगामी दोन-तीन महिन्यात निर्यातक्षम दर्जेदार केळी कापणीला येणार आहे. म्हणून या केळीला परदेशात मोठी मागणी मिळत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना २५ एप्रिल पासून सुरु होत आहे.

अरब देशांमध्ये सुमारे एक महिना आधीपासूनच केळी आयात करून प्रीकुलिंग आणि रायपनिंग चेंबर मध्ये साठवण्याची सुरुवात होते. या आयातीला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. यावर्षी फिलिपाईन्स या केळी निर्यात करणाऱ्या प्रमुख देशात मोठा दुष्काळ पडल्याने आणि इक्वाडोर या अन्य केळी उत्पादक देशात चक्री वादळ झाल्याने तेथून फारशी केळी अरब देशात निर्यात होणार नाही अशी स्थिती आहे; म्हणून जळगाव जिल्ह्यातील केळीला आगामी काळात मोठी मागणी येत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. जैनसह केळी निर्यातीत अग्रगण्य अशा पाच सहा कंपन्या रोजच अरब देशांत केळी निर्यात करीत आहेत. उलट कापणी योग्य आणि निर्यातक्षम केळी पुरेशी नसल्याने निर्यातीसाठी केळी कमी पडत असल्याचे चित्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. कुठलीही विदेशातील केळीची ऑर्डर रद्द झालेली नाही. आजही सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात तसेच जळगाव जिल्ह्यातही निर्यातीसाठी कापणी सुरू आहे असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

केळी वाहतुकीत वाढ 
दरम्यान, येथील बाजार समिती कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या पंधरवड्यात तालुक्यातून उत्तर भारतात रवाना झालेल्या केळीच्या ट्रकची संख्या वाढताना दिसून येत आहे. १ मार्चला ६८ ट्रक्स भरून केळी तालुक्यातून उत्तर भारतात रवाना झाली होती. नंतरच्या १५ दिवसात ट्रक्सची संख्या दररोज ८० पर्यंत पोचली आहे. यावरून केळीची मागणी उत्तर भारतातही होत असल्याचे दिसून येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com