esakal | केळी भाव घसरल्याने शेतकरी कोलमडला 

बोलून बातमी शोधा

null

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि केंद्रीय कृषिमंत्री यांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च मिळण्याची मागणी त्यात करण्यात आली. व्यापारी आणि शेतकरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे व्यापारी बंधूंनी व्यापक दृष्टीने या प्रश्नाकडे पाहावे. 
- वसंतराव महाजन, (चिनावल ता. रावेर). 
सचिव, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ, दिल्ली. 

केळी भाव घसरल्याने शेतकरी कोलमडला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रावेर  : या आठवड्यात तालुका आणि जिल्ह्यातील केळी उत्तर भारतात व्यवस्थित रवाना होत असली, तरीही केळीला मिळणाऱ्या नगण्य भावामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. उत्कृष्ट आणि निर्यातक्षम दर्जेदार केळीला साडेतीनशे- चारशे रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती आहे. उत्पादकाला जगवायचे असेल, तर किमान ७०० रुपये क्विंटलचा भाव द्यावा, अशी आर्त हाक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापारी बांधवांना घातली आहे. 

गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुका आणि जिल्ह्यातून उत्तर भारतात केळीची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, केळीला जेमतेम साडेतीनशे- चारशे रुपये भाव मिळत आहे. कोरोनाची स्थिती आज ओढवली नसती, तर केळीला किमान तेराशे- चौदाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला असता. मात्र, आता वाहतुकीच्या अडचणीचे निमित्त पुढे करून आणि पिकलेला माल बाजारपेठेत पोहोचणार नाही या भीतीपोटी केळीला अगदीच नगण्य हा मिळत आहे. या मिळणाऱ्या नगण्य भावामुळे शेतकरी ५ वर्षे मागे पडत आहे. याबाबत असंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांनी 'सकाळ'शी संपर्क साधत व्यापारी बांधवांना आर्त हाक दिली आहे. 

असंख्य युवा शेतकऱ्यांनी केळी निर्यात करण्याच्या आशेवर यावर्षी केळीवर मोठा पैसा खर्च केला आहे. मात्र, मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती आहे. केळीची मशागत, टिश्यूकल्चर रोपे, ठिबक सिंचन, फ्रूट केअर आणि अन्य खर्च पाहता किमान सहा ते सात रुपये किलो उत्पादन खर्च येतो. सध्या मिळणाऱ्या नगण्य भावामुळे असंख्य शेतकरी निराश झाले आहेत. व्यापारी बांधवांनी ७०० रुपये क्विंटलचा भाव शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. सध्या बाजारपेठेत उत्कृष्ट पिकलेली केळी पन्नास ते साठ रुपये डझन या दराने विकली जात आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी बांधवांनी सहकार्य करून दोन पैसे नफा यंदा कमी घ्यावा व केळीच्या भविष्यासाठी योग्य भाव उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करीत आहेत.