बापाला झाली अटक...बदनामीपोटी मुलाने उचलले टोकाचे पाऊल! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

चोरीला गेलेला माल जप्त करण्याची दक्षता घेण्यात येत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याचा मानसिक धक्का रवींद्र कुंभार यांच्या मुलाला- मयूरला बसला. यामुळे मयुरने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची चर्चा होती .

रावेर : येथील कुंभार वाड्यात झालेल्या घरफोडीप्रकरणी वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्याचा मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांच्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी घडली. याबाबत रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . 

येथील कुंभार वाड्यातील मयूर रविंद्र प्रजापती (वय 22) या युवकाने सायंकाळी सहा वाजेपूर्वी रावेर रेल्वे स्थानकावर खंबा नंबर 178 / 17/ 21 मेन लाईनमध्ये एका धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याच्याजवळील मोबाईल वरून त्याची ओळख पटली. याबाबत स्टेशन मास्तर श्री. सिंग यांनी दिलेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा हवालदार त्र्यंबक वाघ व रवींद्र लोंढे यांनी केला. 

क्‍लिक कराः   नेहेते परिवाराने जोपासला दधींचीचा वारसा
 

दरम्यान मृत मयूरचे वडील रवींद्र कुंभार यांना पोलिसांनी घरफोडी केल्याच्या संशयावरून सायंकाळी ताब्यात घेतले. कुंभार वाड्यातील प्रकाश सीताराम कुंभार यांच्याकडे आज झालेल्या घरफोडीत रवींद्र कुंभार यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांनी कबुली दिल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकात केला आहे. चोरीला गेलेला माल जप्त करण्याची दक्षता घेण्यात येत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याचा मानसिक धक्का रवींद्र कुंभार यांच्या मुलाला- मयूरला बसला. यामुळे मयुरने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची चर्चा होती . दरम्यान मयूर हा कुशल मूर्तिकार होता. तो येथील प्रख्यात चव्हाण पेंटर यांच्याकडे मूर्ती काम करीत होता. वडील मजुरी करत होते. तो घरातील एकुलता एक मुलगा होता. व एक विवाहित बहीण आहे. मे मध्ये त्याचा विवाह निश्‍चित झाला होता. यामुळे त्याच्या अकाली मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयूरने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या वडिलांना सांगावे की नाही या बाबत चर्चा सुरू होती. 

नक्की वाचा : मयत खाते धारकांना वारस लावुन कर्जमाफीचा लाभ 
 

मृतदेह पाहतांना प्रवासी पडला 
आत्महत्या केल्यानंतर मयुरचा मृतदेह रेल्वे लाईन जवळ पडला होता. यावेळी कर्नाटक एक्‍सप्रेस मधील उत्तर प्रदेशचा प्रवासी हा चालत्या रेल्वेतून डोकावून मृतदेह पाहत असतांना त्यांच्या डोक्‍याला खांबा लागल्याने खालती पडून जखमी झाला. त्याला उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver father arrest police and boy sucide railway track