पालकमंत्र्यांकडून केळी उत्पादकांची निराशा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

रावेर : अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील वादळग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांची निराशा केली. त्यांनी नुकसानभरपाई तर घोषित केलीच नाही आणि नुकसानीची पाहणीही न करून शेतकऱ्यांची उपेक्षाच केली. 
पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असताना आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी त्यांना पाहणी करण्यासाठी विनंती करतील किंवा किमान मदत तरी जाहीर करण्यासाठी गळ घालतील, असा अंदाज होता. पण तो फोल ठरला. 

पालकमंत्री पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी खाते सोपविले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार तीन मंत्र्यांकडे दिले आहेत. त्यात श्री. पाटील यांच्याबरोबर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. 
आजच्या दौराकाळात पालकमंत्री पाटील यांनी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक नियोजनासाठी वेळ दिला; पण दीडशे कोटी रुपयांचे नुकसान झालेला शेतकरी मात्र उपेक्षित राहिला. 
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात एकाच वेळी वादळ आणि गारपीट झाली. तिकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला, मदत जाहीर झाली; पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आश्‍वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही. श्री. पाटील आणि अन्य दोन मंत्र्यांची समिती इतर निर्णय घेऊ शकते; मग शेतकऱ्यांबाबतचा निर्णय का प्रलंबित ठेवला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

भाजपतर्फे निवेदन 
दरम्यान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्‌माकर महाजन यांनी मात्र त्यांना जळगावात निवेदन दिले. भरपाई जाहीर होत नसल्याने तालुक्‍यात लोकप्रतिनिधींना फिरणेही मुश्‍कील झाल्याचे कटू सत्य त्यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र जिल्ह्यातील शेतकरी अद्याप वंचित असल्याचे श्री. महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त केळीची पाहणी करावी आणि तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्यांनाही फक्त आश्‍वासनच मिळाले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात आमदार हरिभाऊ जावळे उपस्थित नव्हते, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news raver palakmantri chandrakant patil banana