शाश्‍वत शेतीसाठी पाण्याचे हवे उत्तम व्यवस्थापन, "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांचा आग्रह  ... 

live
live

नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला.

दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे "सकाळ-ऍग्रोवन'ने यंदाचे वर्ष जलव्यवस्थापन वर्ष म्हणून जाहीर केले. त्यातंर्गतची पहिली परिषद रावसाहेब थोरात सभागृहात झाली. 

  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. प्रायोजकत्व ड्रीप इंडिया इरिगेशन आणि सपल ऍग्रोटेक तर्फे स्विकारण्यात आले होते. "सकाळ-ऍग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर, महा ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश पडवळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरीच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ.कल्याण देवळाणकर, अखिल भारतीय जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत बोडके, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, नाशिक "आत्मा' चे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, वसुंधरा पाणलोट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक राकेश वाणी, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, ड्रीप इंडिया इरिगेशनचे संचालक झुंबरलाल भंडारी, सपल ऍग्रोटेकचे व्यवस्थापकीय संचालक केशव चव्हाण, गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, शेतकरी, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते. 

मल्चिंगद्वारे 70 टक्‍क्‍यांपर्यंत पाणीबचत 
मल्चिंगद्वारे 50 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याची बचत होते, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की बागांसाठी प्लास्टिकऐवजी पाचोळा, भुसा, काडी-कचऱ्याचे मल्चिंग करायला हवे. तसेच पाण्यासाठी बोअर खोदल्या जातात. पाणी न लागल्यास बोअर शेतकऱ्यांनी बुजवायला हव्यात. पूर्वी द्राक्ष बागांना ठिबकने पाणी मोघम स्वरुपात दिले जायचे. संघातर्फे परदेशातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले. तेंव्हापासून जमिनीची आर्द्रता मोजून पाणी देण्यास सुरवात झाली. त्यासाठी शेतकऱ्यांनी तीन फूट खोल खड्डा खोदला. त्यातून पाण्याची बचत होऊ लागली. आता मात्र हलकी जमीन असल्यास आठ आणि काळी जमीन असल्यास बारा दिवस दोन पाण्यातील अंतर ठेऊन एकावेळेस सहा ते सात तास पाणी शेतकऱ्यांनी द्यायला हवे. 

श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की शेतात ओलावा राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताहेत. सेंद्रीय कर्ब, ओलावा शेतकऱ्यांनी सिद्ध केला आहे. त्याचा अवलंब इतर शेतकऱ्यांनी करायला हवा. मुळातच, शेती शाश्‍वत करण्यासाठी पाणीव्यवस्थापन महत्वाचे आहे. साठवलेल्या पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करत संपत्ती निर्माण करायला हवी. 
पाण्याची पातळी घटत असताना अधिक पिके घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. तसेच सरकारकडून अनुदान मिळत असल्याने आय. एस. आय. साहित्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे श्री. भंडारी यांनी सांगितले. 

शेततळी हा रामबाण उपाय 
अंकुश पडवळे ः कोरडवाहू शेतीत पीक एका पाण्यावर काढण्यासाठी संरक्षित पाण्याचा वापर करावा. त्यासाठी शेततळी हा रामबाण पर्याय आहे. शेततळ्यासाठी जमिनीच्या भावाचा विचार केला जाऊ नये. पाच एकरामागे एक एकराच्या शेततळ्यात दीड कोटी पाण्याचा संचय करत जानेवारी ते जुलैपर्यंत पाणी देण्याचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढीपेक्षा गुणवत्ता महत्वाची मानून मातीची सुपिकता, सेंद्रीय कर्ब, बारमाही पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष द्यावे. उपलब्ध पाण्याएवढी शेती करावी. आता नियंत्रणाबाहेर गेलेले रोग आणि खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन निर्जीव होण्याचे प्रमाण वाढल्याने जमीन नापिकीच्या दिशेने निघाली आहे. दूषित पाण्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे विहिरी, बोअरकडून शेततळ्याकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात "वॉटर बजेट' करत "पीक पॅटर्न' ठरवावा. सोलापूरच्या शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या तेलकट डागावर पाणीव्यवस्थापन मधून नियंत्रण मिळवले आहे. 

माती-पाणी परीक्षण उत्पादन खर्च करते कमी 
डॉ. आर.जी. सोमकुंवर ः द्राक्षामध्ये पाण्याचे काटेकोरपणे वापर होतो. वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत पाणी लिटरने दिले जाते. बागेतील बाष्पीभवनाचा वेग यावर पाण्याची मात्रा ठरवली जाते. उन्हाच्या तडाख्यात अधिक बाष्पीभवन होत असल्याने एक मिलीमीटर बाष्पीभवनासाठी हेक्‍टरी दिवसाला 4 हजार 200 लिटर पाणी द्यायला हवे. द्राक्षांचा हिरवा, लाल, काळा रंग आणि गोल, लांबट आकाराच्या मण्याचा एकसारखा रंग आवश्‍यक असतो. एकसारखी जाडी, ताजेपणा, गोडी, आम्लाचे प्रमाण, टिकावूपणा, उर्वरित अंश नसणे म्हणजे, गुणवत्तापूर्ण उत्पादन होय. माती-पाणी परीक्षणातून वाढीवर परिणाम करणारे घट आणि जमिनीतील अन्नद्रव्याची स्थिती समजल्यावर त्यांचे नियोजन करावे. पान-देठाच्या परीक्षणातून अन्नद्रव्याचे नियोजन केलेजाते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्याची मदत होते. रोग-कीडीच्या नियंत्रणासाठी महत्वाचे असते. 
..... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com