esakal | संचारबंदीतही..चोरीछुपे व्यवसाय सुरू !

बोलून बातमी शोधा

carfu
संचारबंदीतही..चोरीछुपे व्यवसाय सुरू !
sakal_logo
By
जगदीश शिंदे

साक्री ः तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असून शेकडो रुग्ण उपचारासाठी धडपड करीत असताना जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांना नियम व अटींचे बंधन घातले आहे, मात्र इतर व्यवसाय चोरीछुपे मार्गाने सुरळीतपणे सुरू असल्याने संचार बंदी नेमकी कुणासाठी हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

साक्री शहरासह तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी आणि विक्री साठी प्रशासनाच्या वतीने विविध नियम व अटींचे बंधन घालण्यात आले आहे. या अटी आणि नियमांचे पालन करून विक्रेते आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी धडपड करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोरोना बाधित रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक औषधोपचारासाठी दवाखान्यांच्या पायऱ्या झिजवत आहेत असे असताना संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश असलेले अवैध मद्यविक्री आणि विनाकारण फिरणाऱ्या लोकांची गर्दी मात्र कमी होताना दिसून येत नाही. साक्री शहरातून जाणारा महामार्गावर असलेली वर्दळ यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल, पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाकडून होणारे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. पोलिस दिसताक्षणी पळणारे पोलिस गेल्यावर पुन्हा रस्त्यावर येत आहेत.

जिल्हाधिकारी यांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यासंदर्भात आदेश पारित केले असताना त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील सूचना महसूल विभाग आणि नगरपंचायत प्रशासन यांना असताना त्याचे उल्लंघन होत असल्याचे सद्यपरिस्थिती वरून आढळून येत आहे. किराणा दुकान, भाजीपाला विक्री करणारे यांना सकाळी सात ते अकरा या वेळेत विक्री करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यानंतरही चोरीछुपे खरेदी विक्री प्रक्रिया सुरू असल्याचे दिसते आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण कसे मिळविणार हा यक्षप्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

हेही वाचा: एक लिटर दुधाचा भाव..दोन पाण्याच्या बाटल्यांएवढा !

वसुली कर्मचारी कोण?

शहरासह तालुक्यात संचारबंदी लागू असल्याने मद्यविक्री बंद आहे. मात्र चोरीछुपे तळीरामांची तहान भागविली जात आहे. दोन दिवसापूर्वी शहरालगत असलेल्या एका हॉटेलवर तपासासाठी काही पोलिस कर्मचारी गेले असताना तेथील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. कर्मचाऱ्याकडून आठ हजार शंभर रुपये काढून घेतले, मात्र त्याची नोंद घेण्यात आली नाही. मग नेमके हे पैसे घेणारा कर्मचारी कोण आणि हे पैसे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून अवैधपणे पन्नास- शंभर रुपयाची वसुली केली जात असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात भाजीपाला विक्रेत्यांकडून केली जात आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेत तात्काळ संबंधितांविरोधात कारवाई करण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे