esakal | अशक्‍य ते शक्‍य : लोकसहभागातून विस्तारले कान नदीपात्र 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule kaan river

कुठल्याही शहरालगत वाहणारे नदीपात्र स्वच्छ आणि सुंदर दिसले, तर ते शहराच्या सौंदर्यात भर घालत असते. तसेच यातून शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मात्र, साक्री शहरालगत वाहणाऱ्या कान नदीपात्र पाहिल्यानंतर अतिशय वाईट चित्र दिसून येत होते.

अशक्‍य ते शक्‍य : लोकसहभागातून विस्तारले कान नदीपात्र 

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : लोकसहभागातून अशक्य ते शक्य करता येऊ शकते, याचा प्रत्यय दोन वर्षांपूर्वी झालेल्या येथील कान नदीपात्र खोलीकरण कामातून आला होता. सातत्याने झालेले दुर्लक्ष व वर्षानुवर्षे घाण साचल्याने कान नदीचे शहरालगतचे पात्र अतिशय अरुंद व उथळ बनले होते. अशा परिस्थितीत शहरातील काही पर्यावरणप्रेमी तरुण एकत्र आले व लोकसहभागातून नदीपात्राचे खोलीकरण करण्याचा त्यांनी निश्चय केला. यातून अवघ्या १५ दिवसांत नदीपात्र २५ ते ३० फुटाने रुंद व खोल करण्यात तरुणांना यश आले. 
कुठल्याही शहरालगत वाहणारे नदीपात्र स्वच्छ आणि सुंदर दिसले, तर ते शहराच्या सौंदर्यात भर घालत असते. तसेच यातून शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मात्र, साक्री शहरालगत वाहणाऱ्या कान नदीपात्र पाहिल्यानंतर अतिशय वाईट चित्र दिसून येत होते. अस्वच्छता व नदीपात्रात गाळ साचून राहिल्याने पात्र अतिशय अरुंद व उथळ बनले होते. यातून याठिकाणी पाणी थांबत नसल्याने शहराच्या नदीपात्रालगतच्या परिसरातील कूपनलिका तसेच विहिरींच्या पाणीपातळीत फरक पडत नव्हता. 

तरूण आले एकत्र
नदीपात्राची ही अवस्था पाहिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी शहरातील काही पर्यावरणप्रेमी तरुण एकत्र आले व त्यांनी ‘मिशन कान नदी खोलीकरण’ या ग्रुपच्या माध्यमातून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले. यात त्यांना शहरासह परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त मदत केल्याने त्यांचे काम मार्गी लागू शकले. यात अनेकांनी यथाशक्ती या कामात योगदान दिले. 

वाढदिवस अन्‌ लग्‍नाच्या आहेराचे दिले पैसे
अनेक मान्यवर, तरुणांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून या कामात मदत केली, तर काहींनी लग्नाच्या आहेराचे पैसेही या कामासाठी दिले. प्रशासनाने या कामास सहकार्य केले. यातून सुमारे तीन ते साडेतीन लाखांच्या एकत्रित खर्चातून १५ दिवसांमध्ये नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. यात २५ ते ३० फुटांपर्यंत रुंदीकरण, तर सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर नदीपात्रात जेसीबी मशिनच्या साह्याने नांगरणी करण्यात आली. याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात नदीपात्र तुडुंब भरले व नदीपात्रालगतच्या कॉलनी परिसरातील अनेक वर्ष बंद असलेल्या कूपनलिका तसेच विहिरींना पाणी आले. तसेच या भागातील पाणी पातळीही कमालीची वाढली. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील पाणीटंचाईची समस्या कमी झाली असून, यात नदीपात्र खोलीकरण व रुंदीकरण काम मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे