घरात त्‍या तिघीच...पण दोघी नाती अन्‌ मुलीस त्‍या अवस्‍थेत पाहून वडीलांना आले चक्‍कर

जगदीश शिंदे
Thursday, 23 July 2020

सुखी संसार सुरू होता. संसाराच्या वेलीवर दोन फुले फुललेली होती. नित्‍यनियमाने पती कामाला गेले...सोबत वडीलही होते. पण असे काय घडले की त्‍या विवाहितेने थेट टोकाचे पाऊल उचलले. दोन्ही चिमुकल्‍या मुलींना सोबत घेवून घरात असे केले की दुपारी जेवणासाठी आलेले पती आणि पित्‍याला धक्‍काच बसला. यात पित्‍याला तिघींना पाहून चक्‍कर आले आणि खाली कोसळले. 

साक्री (धुळे) : शहरातील आदर्शनगर परिसरात पती- पत्‍नी आणि दोन मुली असा परिवार वास्‍तव्यास राहत होता. फर्निचरचे काम करणारा नवरा सकाळी कामावर गेला आणि विवाहित महिलेने दोन्ही मुलींसह गळफास लावून आत्‍महत्‍या केल्‍याची दुर्दैवी घटना आज घडली. दुपारी महिलेचे वडील व पती घरी जेवणासाठी आले असताना सदरची घटना उजेडात आली. 

सासरे- जवाई सोबत गेले कामाला
आदर्शनगर येथे पंकज शिंदे व त्यांची पत्नी अनिता (वय 28), मुलगी रिया (वय 5) व भाग्यश्री (वय 3) हे राहत होते. मागील आठ ते दहा दिवसांपूर्वीच विवाहितेचे वडील मोहन काशिनाथ जाधव (रा. पोहाणे, ता. मालेगाव) हे देखील आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत राहण्यास आले होते. पंकज शिंदे व त्यांचे सासरे काशिनाथ जाधव हे दोघेही फर्निचर बनवायचे काम करतात. आज सकाळी ते नऊच्या सुमारास मंजीत शॉपी समोरील दुकानात फर्निचरचे काम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी अनिता शिंदे व मुलगी रिया व भाग्यश्री हे होते. 

दरवाजा लोटला अन्‌ वडील कोसळले खाली
फर्निचरचे काम आटोपून दोघेजण दुपारचे जेवण करण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास घरी आले. काशिनाथ जाधव यांनी घराचा दरवाजा लोटला असता दरवाजा आडोसा लावून ठेवलेली प्लास्टिकची खुर्ची खाली पडली. यानंतर घरात प्रवेश करून बघितले असता, बैठक रूममध्ये छताच्या पाईपपास दोरीच्या साह्याने अनिता शिंदे, मुलगी रिया व भाग्यश्री या तिघांनीही गळफास घेतलेला दिसला. आपली मुलगी व दोन्ही नात यांना अशा स्थितीमध्ये पाहून काशिनाथ जाधव यांना चक्कर आल्याने खाली पडले. 

सारे काही आनंदात तरीही आत्‍महत्‍या? 
पंकज शिंदे यांनी व कॉलनीतील नागरिकांच्या मदतीने पोलिस येण्याच्या अगोदर गळफास घेतलेल्या तिघांना खाली उतरवले. त्यांना त्वरित साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून तिघांनाही मयत घोषित केले. सदर घटनेबाबत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दर दिवशी ठरलेले काम नियमितपणाने करून चरितार्थ भागविणाऱ्या कुटुंबाला आत्महत्या सारखे दुर्दैवी पाऊल उचलण्याचे दुर्भाग्य सुचावे ही बाब समाजाला चटका लावून जाणारी असल्याने संपूर्ण साक्री शहरासह परिसर सुन्न झाला आहे. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी एरवी समाधानी चेहऱ्याने वावरणारे हे दांपत्य यातील पत्नी मुलींसह या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी पाऊल का उचलले हे स्‍पष्‍ट होवू शकले नाही. 

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sakri dhule mother sucide two daughter in home