शेतशिवारात लावतात ढीग; तेथून नाशिक– मुंबईकडे होते रवाना

जगदीश शिंदे
Monday, 31 August 2020

अनेक निर्जन ठिकाणी शेत- शिवारात वाळू वाहतूक करणाऱ्यांनी ठेपे तयार केले आहेत. याठिकाणी ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करून तो नाशिक आणि मुंबईकडे रवाना करण्यासाठी मोठ्या ट्रकमध्ये भरली जाते.

साक्री : तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्यांची दांडगाई दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पांझरा-कान नदीच्या खोऱ्यात अन् छोट्या मोठ्या नाल्यालगत असलेल्या सर्वसामान्य गावकऱ्यांना आणि वाटसरूंना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्यांविषयी तक्रार करणाऱ्यांना दमदाटी करण्यात येते. परिणामी तोंडदाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. 

तालुक्यातील अनेक निर्जन ठिकाणी शेत- शिवारात वाळू वाहतूक करणाऱ्यांनी ठेपे तयार केले आहेत. याठिकाणी ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करून तो नाशिक आणि मुंबईकडे रवाना करण्यासाठी मोठ्या ट्रकमध्ये भरली जाते. रात्रीच्यावेळीच नाही तर भर दिवसाही ही चोरटी वाळू वाहतूक होते, असे असताना तालुका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. 

वाहतूकदारांचे प्रशासनाशी हितसंबंध 
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक चालकांचे प्रशासनातील अधिकारी आणि सहकाऱ्यांसमवेत अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा होत आहे. यामुळे काही किरकोळ कारवाईचे प्रकार वगळता अन्य मोठी कारवाई झाल्याचे अद्याप तालुकावासीयांना अनुभवास आलेले नाही. परिणामी वाळू वाहतूक करणाऱ्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांना आणि वाहनचालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत उपाययोजना होत नसल्याने तालुक्यात असंतोष पसरत आहे. या असंतोषाचे पर्यवसान आगामी काळात मोठ्या स्वरूपात समोर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

वाहनांमुळे रस्त्यांची दुर्दशा... 
या ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची वाट लागली असून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत, तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. लहान मोठ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जावे लागते. अशा परिस्थितीत कायद्याचे राज्य असले पाहिजे ही केवळ एक वल्गनाच ठरू लागल्याचे चित्र आहे. वाळू वाहतूक करणाऱ्यांनी तहसील कार्यालय आणि पोलिस ठाणे परिसर या ठिकाणी आपले काही माहीतगार उभे करून ठेवलेले असतात. हे माहीतगार अधिकाऱ्यांच्या हालचालीवरून किंवा त्यांच्या वाहनाच्या पाठलाग करून अधिकारी नेमके कुठे जात आहेत याचा मागमूस घेत वाहतूक करणाऱ्यांपर्यंत निरोप पोहोचवण्याचे काम करतात. यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांना धोक्याची घंटा कळत असून वाळू वाहतूक कोणत्या दिशेने होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय घेणे सोपे होत असते. या सर्व कामात प्रशासनातील काही कर्मचारी आर्थिक लाभापोटी ही माहिती वाळू वाहतूक दारापर्यंत पोहचवत असल्याचीही चर्चा आहे. 

रोजगार, धमकावण्यापर्यंत मजल 
सध्या तरुणांना शासकीय निमशासकीय नोकऱ्या नाहीत. कमी मेहनतीत जास्त पैसा मिळत असल्याने अनेक तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होतात. या व्यवसायातील स्पर्धा आणि मिळणारा पैसा यातून उद्भवणारे वाद आता नियमित झाले आहेत. अगदी तीन दिवसापूर्वी स्वतः तहसीलदार यांना धमकावण्यापर्यंत मजल वाळू वाहतूक दारांची गेली. यामुळे वेळीच प्रशासनाने या सर्व गोष्टीची दखल घेत वाळू वाहतुकीचा विषय गंभीर होत आहे. तो वेळीच थांबवणे अपेक्षीत आहे. तसे न झाल्यास सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारेल एवढे मात्र नक्कीच.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sakri dhule valu vahtuk nashik mumbai late night