पत्नीच्या वादाला कंटाळून सोडले मुंबई...सायकलने 420 किमीचा प्रवास, गावात आला आणि... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

दररोजच्या वादाला कंटाळून त्याने मुंबई सोडले. तेथून तो सायकलने चक्क 420 किमी.चा प्रवास करीत तीन दिवसांत सारंगखेडा गाठले. येताना निसर्ग चक्रीवादळाचाही सामना केला. मात्र, त्याला मित्रांसह घरच्यांनी त्याचे स्वागत करण्याऐवजी क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला.

सारंगखेडा : लॉकडाउनमुळे कायम घरातच होता. यात पत्नी रोजच वाद घालायची. अखेर दररोजच्या वादाला कंटाळून त्याने मुंबई सोडले. तेथून तो सायकलने चक्क 420 किमी.चा प्रवास करीत तीन दिवसांत सारंगखेडा गाठले. येताना निसर्ग चक्रीवादळाचाही सामना केला. मात्र, "बम्बई से आया मेरा दोस्त...दोस्त को क्वारंटाईन करो' सांगत त्याला मित्रांसह घरच्यांनी त्याचे स्वागत करण्याऐवजी क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. ही घटना कुठल्या सिनेमातील नव्हे प्रत्यक्ष सारंगखेडा गावातील आहे. 
जगात धुमाकुळ घालणाऱ्या कोरोना विषाणू एक- एक देश पादाक्रांत करीत भारतात घुसखोरी केली. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला आणि सांस्कृतिक राजधानी मानली जात असलेल्या पुण्याला कोरोनाचा गडद विळखा पडला. तेथून कुठेही गेला तर तो संशयित ठरतो. कोरोनाचा सर्वांत मोठा रुग्णांचा आकडा मुंबईने गाठल्याने तेथून गावांकडे येणाऱ्यांना संशयित नजरेने पाहतात. तसेच त्यांना क्वारंटाईन व्हावे लागते. 

वीस वर्षांपासून सोडले गाव 
गत वीस- बावीस वर्षापूर्वी त्याने गाव सोडून कामानिमित्ताने परिवारासह मुंबईची वाट धरली होती. तेव्हापासून त्याने गावाकडे पाठ फिरविली होती. तर कधीच गावी आला नाही. पण पत्नीशी वाद होत असल्याने त्याला अखेर मुंबई सोडावी लागली. ती देखील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात आलेले निसर्ग चक्रिवादळाच्या परिस्थितीत. 

420 कि.मीचा प्रवास अन्‌ रस्त्यात चक्रिवादळ 
मुंबईत काम धंदा नसल्याने घरीच राहत असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने पत्नीशी वाद सुरू झाला. शेवटी कंटाळून वाद वाढण्यापेक्षा गावाकडे निघून जातो असे सांगत त्याने चक्क स्वतःची सायकल काढली. तीन दिवसात मुंबईहून नाशिकमार्गे मालेगाव, धुळे करीत सारंगखेडा गाठले. साधारण 420 कि.मी.चा प्रवास सायकलने पुर्ण केला. या प्रवासात नाशिक, मालेगाव दरम्यान निसर्ग चक्रीवादळाशीही सामना केला. 

गावात येताच केले क्‍वारंटाईन 
सकाळी गावी पोहचल्यावर भावाच्या मुलांच्या घरी आला. त्याला पाहून सर्वच चकीत झाले. घरात प्रवेश न करू देता त्याच्या जुन्या मित्रांनी पोलीसांना त्याच्या आगमनाची व मुंबई कनेक्‍शनची माहिती दिली. सध्या त्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे गावात तीन दिवसांचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे लागलीच त्याला दवाखान्यात पाठविले. बंम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को क्वारंटाईन किया असे म्हणण्याची वेळ सारंगखेडा ग्रामस्थावर आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda husband wife crashes man out mumbai