
आंदोलक आक्रमक होऊन संशयिताला फाशीची शिक्षा द्या, या मागणीवर ठाम होते. आंदोलकांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मार्गावर सुमारे सात किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सारंगखेडा : येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी संशयिताला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नंदुरबार, दोंडाईचा भागातील दोनशेहून अधिक मोर्चेकऱ्यांनी सारंगखेडा तापी पुलावर बुधवारी (ता. ४) रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन थांबावे, यासाठी अखेर पीडित कुटुंबाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. यामुळे दोंडाईचा रस्त्यावर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
वाचा- दोन वर्षापासून जामफळ प्रकल्पग्रस्तातील शेतकरी मोबादल्या पासून वंचीत !
येथे प्रेमसंबंध नाकारल्याने अल्पवयीन मुलीची २३ ऑक्टोबरला मध्यरात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून, ठिकठिकाणी संघटनांकडून निषेध नोंदविण्यात येत आहे. येथे बुधवारी या प्रकरणातील संशयिताला फाशीची शिक्षा द्यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आंदोलन करण्यात येईल, अशी सोशल मीडियावर काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्लिप व्हायरल केली होती. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती काही समाजबांधवांना न मिळाल्याने नंदुरबार, दोंडाईचा तालुक्यातील दोनशेहून अधिक आंदोलक तापी पुलापर्यंत आल्यावर पोलिसांनी अडवून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आक्रमक होऊन संशयिताला फाशीची शिक्षा द्या, या मागणीवर ठाम होते. आंदोलकांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मार्गावर सुमारे सात किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन थांबविण्यासाठी अखेर पीडित कुटुंबाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी विनंती केल्याने आंदोलन थांबविण्यात आले. पोलिस उपअधीक्षक श्रीकांत गुमने, निरीक्षक नंदावळकर, निरीक्षक पंडित सोनवणे, निरीक्षक भगवान कोळी, उपनिरीक्षक मुकेश पवार, श्री. महाले, कमलाकर चौधरी आदी उपस्थित होते.
पोलिसांनी बाळगली सतर्कता
आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली. पहाटेपासूनच या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता. आंदोलनाची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी व्यूहरचना केली. गावात अनुचित प्रकार घडणार नाही, म्हणून आठवडाभरापासून चोख बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी बंदोबस्तासाठी सहा अधिकारी, १२५ पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे नऊ जवान, २० महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
संपादन- भूषण श्रीखंडे