‘नार-पार’च्या पाण्यासाठी प्रसंगी रक्तही सांडणार! : डॉ. सतीश पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे ‘नार-पार’चे पाणी वळविण्यासाठी रक्त जरी सांडावे लागले, तरी आपला लढा सुरू राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले. 

जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे ‘नार-पार’चे पाणी वळविण्यासाठी रक्त जरी सांडावे लागले, तरी आपला लढा सुरू राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले. 

डॉ. पाटील म्हणाले, की आपली राजकीय सुरवात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतिपदापासून झाली आहे. सातत्याने पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेशी बांधिलकीचा अनुभव असल्याने सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासकामांना देण्याची शिकवण वडील (कै.) आमदार भास्कररावआप्पा पाटील यांनी आपल्याला दिली. त्यांचा आशीर्वाद व शरद पवार यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने विधानसभेची ही लढाई लढत आहे. यात नक्कीच मतदार आपणास प्रचंड मतरूपी आशीर्वाद देतील, अशी आपल्याला खात्री आहे. 

लाटेच्या प्रभावाने जनतेला भुरळ घातली 
२०१४ मध्ये ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सोशल मीडियावर भावनिक आवाहन करून भुरळ घातली. जनतेनेदेखील आशा ठेवत युतीच्या सरकारला निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत योजनांचे भुलभुलय्या दाखवीत कोणतीच योजना पूर्णत्वास आणली नाही. लोकांना नेहमीच आश्वासित केले. बेरोजगार युवकांची भरती सोडून ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची भाजपमध्ये सामील करण्याची ‘मेगा भरती’ पुढे केली. पाच वर्षांत राज्यात कोणतेच असे भरीव काम झालेले दिसत नाही. जी धरणे झाली, ती काँग्रेसच्या काळात झाली. जिल्ह्यात (कै.) मधुकरराव चौधरी, जे. टी. महाजन, के. एम. पाटील, अरुणभाई गुजराथी यांनी विकासकामांना भरीव मदत केली. त्यांच्यामुळे आज जिल्ह्यात बरेच प्रश्न सुटले. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणासाठी भरीव निधी दिल्याचा गवगवा होत आहे. मात्र, अद्यापदेखील काम थंड बस्त्यात पडले आहे. 

राजकारणातील ‘भीष्माचार्य’ पवार 
राज्याचे मुख्यमंत्रिपद तसेच केंद्रात कृषिमंत्रिपद भूषविलेले शरद पवार यांनी ‘ईडी’ची केलेली दैनावस्था व प्रचाराचा झंझावात तरुणांना लाजवेल, असा उत्साह ‘राष्ट्रवादी’ला नवचैतन्य देणारा ठरला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कधीही रांगेत उभे केले नाही. सुमारे ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली. पीककर्ज कमी केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. उद्योगांना पाठबळ देत राज्य व देशातील आर्थिक सुबत्ता बळकट केली. विरोधकदेखील त्यांचे मार्गदर्शन घेतात. ते राजकारणातील ‘भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जातात. 

मतदारसंघात विकासाचा ‘अजेंडा’ 
मतदारसंघ नेहमीच दुष्काळी राहिला आहे. ‘नदीजोड’च्या माध्यमातून व निसर्गकृपेने मतदारसंघात पाणी आले. आता मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक शाळेस गतवैभव प्राप्त करून शाळांचे ‘डिजिटायलेझशन’ करत महाराष्ट्रातील थोर पुरुष, साधू- संत व ऐतिहासिक साक्ष देणारे प्रसंग विद्यार्थी दाखवीत संस्कारशील पिढी निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवत मतदारसंघातील शेतकऱ्यांचे गट तयार करून कपाशी व शेतीवर आधारित पिकाला योग्य मोबदला कसा मिळेल, हेच ध्येय उराशी बाळगून बेरोजगारी, युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध प्रकल्प आणून संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करण्याचा आपला मनोदय आहे, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news satish patil sakal sanwad innterveiw