भाषांतराच्या प्रक्रियेकडे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी-कवी सुशीलकुमार शिंदे

live
live


नाशिक ः मराठी भाषेत खूप गोष्टी लिहिल्या जातात. त्याचा दर्जाही चांगला असतो, पण या लेखकांना चांगली प्रतिष्ठा मिळत नाही. आपल्या साहित्याचे इतर भाषेत भाषांतर होत नाही. कारण आपल्याकडे भाषांतराच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले जात असून, ते दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते, कवी सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी (ता. 5) व्यक्त केले. 

मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सावानाच्या 52 व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सावानाचे उपाध्यक्ष कवी किशोर पाठक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मेळाव्याचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व लेखक दीपक करंजीकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मागील वर्षीच्या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षा अपर्णा वेलणकर, कविसंमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, ज्येष्ठ अभिनेत्री विद्या करंजीकर, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, अभिजित बगदे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, वसंत खैरनार, शंकर बर्वे, वेदश्री थिगळे, संगीता बाफणा, श्रीकांत बेणी, बी. जी. वाघ, निवृत्त सनदी अधिकारी आर. जी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

श्री. शिंदे म्हणाले, की अनेक चांगले लेखक आहेत, पण अजूनही त्यांचे साहित्य दुसऱ्या भाषेत आलेले नाही. इतर भाषांतील साहित्य मात्र लवकर भाषांतरित होते. साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. "शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाला. ज्याला जसे आकलन होते तसे आतून बाहेर पडते. मला काहीतरी वाटले. मी अस्वस्थ झालो आणि त्यातून मी लिहीत गेलो. 
जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की माणसाचं श्रेष्ठत्व शब्दांत आहे. शब्दांतून मांडलेल्या साध्या साध्या गोष्टी जीवनाला कलाटणी देऊ शकतात. त्याचे केंद्रस्थान ग्रंथालय आहे. अभिजित बगदे यांनी सूत्रसंचालन, तर शंकर बर्वे यांनी आभार मानले. 

पर्यावरण, सामाजिक कवितांनी रंगले संमेलन 

जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात विजयकुमार मिठे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यात "खूप शिकावं पोरी तू, असं खूप मोठं व्हावं, भोवतीच्या वादळाची, कधी करू नये गय' ही कविता अरुण इंगळे यांनी सादर केली. कवी रवींद्र मालुंजकर यांनी "आल्या पावसाच्या सरी, किती लपविशी अंग, आहे खट्याळ तो राजा, जसा उधळतो रंग' ही कविता सादर केली. त्यानंतर प्रशांत केंदळे यांनी "असा पाऊस आला की, मिळंना प्यायला पाणी, तुझी रे पावसा आता, कशी मी गायची गाणी' यांसारख्या विविध विषयांवरील कवितांच्या सादरीकरणाने कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले, जयश्री कुलकर्णी यांनी केले. कविसंमेलनात विवेक उगलमुगले, चंद्रकांत महामिने, डॉ. प्रिया रिसबूड, सुमती पवार, प्रा. राजेश्‍वर शेळके, रवींद्र मालुंजकर यांच्यासह विविध कवींनी सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com