मनपा शाळेच्या रिक्‍त इमारतीत पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक : महापालिकेच्या सिडकोमधील शिवाजी चौक परिसरातील शाळेच्या रिकाम्या इमारतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. ही कार्यवाही महिन्याभरात करण्यात येईल, असा शद्ब विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी दिला. तसेच उपकेंद्राच्या जागेसाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती कुलगुरुंनी दिली. 

नाशिक : महापालिकेच्या सिडकोमधील शिवाजी चौक परिसरातील शाळेच्या रिकाम्या इमारतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. ही कार्यवाही महिन्याभरात करण्यात येईल, असा शद्ब विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी दिला. तसेच उपकेंद्राच्या जागेसाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती कुलगुरुंनी दिली. 

विद्यापीठाच्या प्रलंबित उपकेंद्रप्रश्‍नी आज युवासेनेच्या शिष्टमंडळाने पुण्यात कुलगुरुंची भेट घेत विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी सिडकोत उपकेंद्र कार्यान्वित करण्याचे विचाराधिन असून महापालिकेकडून परवानगी मिळताच इमारतीत दुरुस्ती केली जाणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले. तसेच विद्यापीठ एम. बी. ए. अर्थात "पुम्बा'तंर्गत नाशिकला एम.बी.ए. चा शिक्षणक्रम उपकेंद्र इमारतीत सुरू केला जाईल. विद्यापीठाच्या विविध विभागातील अधिकारी इथे उपलब्ध होतील. 

पुण्यात कुलगुरुंच्या भेटीसाठी उपस्थित असलेल्या शिष्टमंडळात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव वरूण सरदेसाई, कार्यकारणी सदस्य सिद्देश कदम, साईनाथ दुर्गे, रुपेश कदम, अधिसभा सदस्य अमित पाटील, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हजारो विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी राज्य, देश, परदेशातून शिक्षण व संशोधनासाठी येतात. या पार्श्‍वभूमीवर तीनशे मुलींसाठी आणि सातशे मुलांना राहता येईल, एवढ्या क्षमतेच्या अतिरिक्त वसतिगृहांची निर्मिती करण्यात यावी. विद्यापीठामध्ये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यासाठी तातडीने परिपत्रक काढावे, अशाही मागण्या शिष्टमंडळाने कुलगुरुंकडे केल्या आहेत. 

वाईनरी, पैठणी अभ्यासक्रम सुरु व्हावेत 
नाशिक जिल्हा जगभरात द्राक्षे आणि वाईनरीसाठी प्रसिद्ध आहे. या क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरु करावा. त्याद्वारे नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत मानांकन प्राप्त असलेली नाशिक जिल्ह्यातील येवल्याची पैठणी साडी ही जगात पोचली आहे. विद्यापीठाने पैठणीशी संबंधित उत्पादन व व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरु करावा, अशी मागणी यावेळी केली. 

""सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी निगडीत विविध प्रश्‍नांसंदर्भात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगुरूंशी चर्चा केली. उपकेंद्र महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन कुलगुरूंनी दिले आहे. अन्य विविध विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.'' 
-अमित पाटील (अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 
 

Web Title: marathi news savitri bai pune university