आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;  ड्रोन मशिनने उसावर फवारणी 

धनराज माळी
Wednesday, 16 December 2020

ड्रोनद्वारे फवारणी केल्यास अल्पदरात म्हणजे ५०० रुपये प्रतिएकर तंतोतंत उसासाठी फवारणी होऊन कीटकनाशकही कमी लागते आणि शंभर टक्के शास्त्रोक्त पद्धतीने फवारणी होते

शहादा ः सातपुडा साखर कारखाना परिसरात ड्रोन मशिनद्वारे उसावर फवारणी सुरू असून, कमी वेळेत विनामनुष्यबळ २० ते २५ कांड्यांच्या उसावर फवारणी करणे अत्यंत सुलभ झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 

आवश्य वाचा- अमरिश पटेल यांनी विधान परिषद सदस्यत्वाची घेतली शपथ -

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात सातपुडा साखर कारखाना अग्रेसर असून, सध्या फवारणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. झाले तर ते फार महागात पडते म्हणून ड्रोनद्वारे फवारणी केल्यास अल्पदरात म्हणजे ५०० रुपये प्रतिएकर तंतोतंत उसासाठी फवारणी होऊन कीटकनाशकही कमी लागते आणि शंभर टक्के शास्त्रोक्त पद्धतीने फवारणी होते. तीन एकरांत फवारणीसाठी फक्त २० मिनिटे लागतात. त्यामुळे आर्थिक व वेळेची बचत होते. या पूर्वी मोठ्या उसावर काही रोग व कीड आल्यास त्याला प्रतिबंध करणे फार जिकिरीचे काम होते. फवारणी करताना विषबाधा होण्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करणे हा उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध झाला आहे.

आवर्जून वाचा- अंगावर बर्फ पडल्‍याने जवानाचा मृत्‍यू; महिनाभरात चाळीसगाव तालुक्‍याने दुसरा जवान गमावला

तिखोरा (ता. शहादा) येथील सातपुडा कारखान्याचे संचालक शशिकांत पाटील व परिवर्धे येथील सभासद हरीश पाटील यांचा शेतात फवारणी सुरू असून, मुबारकपूर (ता. निझर, जि. तापी) येथील शरद पटेल यांनी ड्रोन विकत घेतले असून, ते परिसरातील सर्व पिकांसाठी फवारणीसाठी उपलब्ध आहे. याकामी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्य शेतकी अधिकारी, तसेच ऊस विकास अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास ड्रोन उपलब्ध केले जाईल, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shada spray on sugarcane in just twenty minutes by drone machine