महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला यश 

bjp
bjp

शहादा (नंदुरबार) : धुळे- नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे माजी आमदार अमरिशभाई पटेल, तर महाविकास आघाडीतर्फे शहादाचे अभिजित पाटील यांनी उमेदवारी केली होती. अभिजित पाटलांकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे बळ असल्याचे मानले जात होते. परंतु महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला यश आले आहे. भाजपच्या नेत्यांनी आपला उमेदवाराला निवडून आणण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा वाखाणण्याजोगी आहे. 

पहिलाच प्रयत्न फसला 
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे सरकारच्या वर्षेपूर्ती निमित्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाविकास आघाडीतर्फे एकत्रित निवडणूक लढविण्यात आली. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. काँग्रेस पक्षाचे १४८ मतदार असूनही उमेदवार अभिजित पाटील यांना पूर्णता मिळू शकले नाही. याचाच अर्थ ‘हमे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था’ या हिंदी चित्रपटातील डायलॉग प्रमाणेच घडले. 

वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची गरज 
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे उमेदवार दिला होता. पक्षातील मतदारांचे संख्याबळ पाहता आघाडीतील उमेदवाराचा विजय निश्चित होता. परंतु पराभव का झाला वास्तविक पाहता नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी विशेष लक्ष घातले असते, तर उमेदवाराचा विजय सहज शक्य होता. भाजपच्या नेत्यांकडून बैठका घेण्यात आल्या. काँग्रेस व महाविकास आघाडीकडून पाहिजे त्या प्रमाणात बैठका झाल्या नाहीत. शिवाय मतदानाच्या दिवशी भाजप नेते आपापल्या कार्यक्षेत्रात तळ ठोकून होते. महाविकास आघाडीत हे दिसले नाही. एकूणच प्रचार, मतदान होईपर्यंत झालेल्या घडामोडींमधून उमेदवाराला निवडून आणण्यास स्वपक्षीय यांनी स्वारस्य दाखवले नाही असेच दिसते. हा पराभव उमेदवाराचा नसून महाविकास आघाडीच्या झाला आहे. जिल्ह्यात राबवलेला हा पहिलाच प्रयोग अयशस्वी झाला आहे. राज्य स्तरावरील पक्षीय नेत्यांनी निश्चितच उमेदवाराचा पराभव का झाला याचा अहवाल मागवणे अपेक्षित आहे. अन्यथा यापुढे भविष्यात महाविकास आघाडीत याच पद्धतीने बेबनाव राहिल्यास भविष्यातील निवडणुकांमध्ये हे अपयश येतच राहील. 

२५ वर्षानंतरची संधी हुकली 
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच मतदार संघ राखीव असल्याने सहाजिकच राजकीय दृष्ट्या विधान परिषद खेरीज आमदारकीची संधी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला मिळू शकत नाही. २५ वर्षानंतर महाविकास आघाडीच्या रूपाने ती संधी प्रथमच शहादा तालुक्‍यास चालून आली होती परंतु तीही आता हुकली. दहाव्या विधानसभेच्या १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहादा दोंडाईचा मतदारसंघातून (स्व.)अण्णासाहेब पी. के. अण्णा पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २००९ मध्ये शहादा दोंडाईचा मतदारसंघाचे विभाजन होऊन शहादा- तळोदा मतदारसंघ झाला. तेराव्या विधानसभेला तो आरक्षित झाल्याने तळोदा तालुक्यातील उमेदवाराने आजतागायत प्रतिनिधित्व केलेले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com