धक्‍कादायक : कोरोनाच्या सर्वेक्षणाला मज्जाव; नागरिकांची पथकाशी हुज्जत, प्रशासनाकडून समजावले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

शहरातील प्रभाग चार कंटेनमेंट झोन आहे. या भागातील अब्दुल हमीद चौक, तकिया बाजार व परिसरात सकाळी सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाची पथके निघाली होती, परंतु स्थानिक रहिवाशांनी पथकांना विरोध करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती.

शहादा : शहरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या झोनमध्ये दाट वस्ती असून शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना काही भागातील नागरिकांनी धुडकावून लावण्याच्या प्रकार घडला. घटनेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भागात दौरा करून नागरिकांची समजूत घातली. 

क्‍लिक करा - अगोदर दिली धमकी मग रात्री संधी साधत क्‍वारंटाईन केलेल्या युवकांनी केले भलतेच 

शहरातील प्रभाग चार कंटेनमेंट झोन आहे. या भागातील अब्दुल हमीद चौक, तकिया बाजार व परिसरात सकाळी सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाची पथके निघाली होती, परंतु स्थानिक रहिवाशांनी पथकांना विरोध करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पथकांनी दक्षता घेत तातडीने माघारी फिरून घडलेल्या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी हजर झाले होते. प्रशासनाने या भागात फिरून सर्वेक्षण करू देण्याबाबत चर्चा करूनही नागरिक जुमानत नसल्याचे दिसून आले. नागरिकांची कंटेनमेंट झोनमधून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू असून त्यांच्याकडून नियमांचा भंग होत असल्याचेही बऱ्याच वेळा स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्रीही गरीब नवाज कॉलनीत सर्वेक्षणासाठी गेलेल्यांना नागरिकांनी अशा प्रकारे विरोध केला होता. परंतु अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर विरोध मावळला होता. दरम्यान ३० पैकी २८ आरोग्य पथकांनी तपासणी पूर्ण केली. तपासणीवेळीअब्दुल हमीद चौकात अडचण आली. 
 
पालिकेने नागरिकांसाठी केलेले नियोजन 
शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग सात ते नऊ व एक ते चारमधील परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीकरिता प्रशासनामार्फ़त मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत. १) प्रतिबंधात्मक क्षेत्रातील फक्त किराणा दुकाने घरपोच सेवा देण्याच्या अटीवर सुरु करण्यात यावीत. २) प्रतिबंधात्मक क्षेत्राव्यतिरिक्त भागात फ़िरते भाजीपाला विक्रेते यांना पालिकेकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यांनी आवश्यक ते ओळखपत्र व व्यवसाय करावयासाठी नेमून दिलेला परिसर याची माहिती पालिका कार्यालयातून घ्यावी. ३)प्रतिबंधात्मक क्षेत्र तसेच इतर क्षेत्रातील फक्त किराणा दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरु ठेवावीत. किराणा दुकान मालकांनी घरपोच सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. ४) नागरिकांनी वाहने आणू नयेत. प्रशासनाने ठिकाठिकाणी लावलेले बॅरिकेडस काढू नये. बॅरीकेडींगजवळ वाहने उभी करावीत अन्यथा वाहने जप्त करण्यात येतील याची नोंद घ्यावी. ५) मास्क लावणे आवश्यक आहे तसेच सॅनिटाईझरचा वापर करणे व फिजिकल डिस्टन राखणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada city no serve people stop team