या शहरात प्रथमच नाही बाप्पाची स्‍थापना...चौकात आहे शांतता 

ganpati bappa
ganpati bappa

शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर प्रतिबंधात्मक क्षेत्रात समाविष्ट असल्याने शहरात एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने श्री गणेश मूर्तीची स्थापना केली नाही. परिणामी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही. दरम्यान घरोघरी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. 

शासनाने ११ जुलैच्या शासन निर्णयानुसार कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या क्षेत्राला प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असल्याने या क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यावर बंधने टाकण्यात आली आहेत. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४०८ पेक्षा अधिक झाली असून शहादा पोलीस ठाणे हद्दीतील शहादा शहरासह अनेक गावात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे. शहादा पोलीस ठाणे हद्दीतील पुरुषोत्तम नगर, मंदाने या गावाचा प्रतिबंधात्मक क्षेत्रात समावेश असल्याने तेथे एक गाव एक गणपती यंदा नाही, तर भोंगरा या गावाचा समावेश प्रतिबंधक क्षेत्रात समावेश नसला तरी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहाय्यक निरीक्षक मनोज भदाणे, निलेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली ७० पोलीस कर्मचारी, ८७ होमगार्ड व एसआरपीचे एक पथक संपूर्ण शहरात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे

दरवर्षी असतात ३२ मंडळे
शहादा पोलीस ठाणे हद्दीत शहरात ३२ सार्वजनिक गणेश मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असल्याने कुठल्याही सार्वजनिक गणेश मंडळाने श्री गणेशाची स्थापना केली नाही. शहरातील अनेक मंडळांची शंभर- दीडशे वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा असतानाही यंदा मात्र कोरोना विषाणूने ही संधी हिरावून नेली आहे. शहादा पोलीस ठाण्यामार्फत प्रतिबंधात्मक क्षेत्रात येणाऱ्या व असणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यात येणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. परिणामी शहरात यंदा रस्त्यावर मंडप नाही, आरास नाही, विद्युत रोषणाई नाही, की सायंकाळचा आरती समयी होणारा भोंग्याचा आवाज नाही. सवर्च शांततेचे वातावरण आहे. 

चौक पडले ओस...
सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने शहरातील अनेक मोठे चौक ओस पडले आहेत. शहरातील विविध भागातील चौकात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळातर्फे मोठ मोठे मंडप टाकण्यात येऊन मोठ्या प्रमाणात विद्युतरोषणाई केली जात होती. संपूर्ण रस्त्यावर विविध प्रकारची विद्युत रोषणाई केली जात असल्याने या दहा दिवसांच्या उत्सव काळात एक नवीन चैतन्य गणेशभक्तांमध्ये संचारत असे. यंदा कोरोनामुळे मात्र सर्वत्र शुकशुकाट आहे. 

घरोघरी बाप्पा विराजमान 
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार नसला तरी शहरात मोठ्या प्रमाणात घरोघरी उत्साहात श्रीगणेशाची स्थापना मंगलमय वातावरणात करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळातर्फे उत्सव साजरा होत नसला तरी नागरिकांनी मात्र आपापल्या घरी बाप्पांना विराजमान केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com