esakal | सावधान : गोचीडपासून पसरतोय अजून एक आजार; प्राण्यांपासून मानवाला संक्रमण 
sakal

बोलून बातमी शोधा

infection from animals to humans

गुजरात राज्यातील बोताड व कच्छ याभागातील जनावरांमध्ये झाल्याचे आढळुन आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरुपाचा असुन या रोगाचा प्रादुर्भाव यापुर्वी कोंगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झाल्याचा इतिहास आहे.

सावधान : गोचीडपासून पसरतोय अजून एक आजार; प्राण्यांपासून मानवाला संक्रमण 

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्हयांमध्ये क्रिमियन कोंगो हिमोरेजिक फिवर (CCHF) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. हा आजार गोचिडांद्वारे होत असून बाधित जनावरांपासून मानवामध्ये संक्रमित होतो. मानवामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे.

या रोगाच्या प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता गुजरात राज्याचा सीमेशी संलग्न नाशिक, नंदुरबार, धुळे व पालघर या भागामध्ये गोचिड निर्मुलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. तसेच आंतरराज्य सीमा रेषेवरील तपासणी नाक्यावर राज्यात येणाऱ्या पशुधनाची तपासणी करण्याचा सुचना अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन यांनी सर्व जिल्ह्यांतील पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत.

क्रिमियन कोन्गो हिमोरेजिक फिवर 
गुजरात राज्यातील बोताड व कच्छ याभागातील जनावरांमध्ये झाल्याचे आढळुन आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरुपाचा असुन या रोगाचा प्रादुर्भाव यापुर्वी कोंगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झाल्याचा इतिहास आहे. हा रोग नैरो व्हायरस या विषाणुमुळे होत असुन हे विषाणु मुख्यत्वेकरुन ह्यालोमा (Hyalomma) या जातीच्या गोचिडांव्दारे एका जनावरांपासुन दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांपासुन मानवांमध्ये संक्रमित होतो. या रोगामुळे पाळीव जनावरांमध्ये (गाई, म्हशी, शेळ्या, मेंढया इ.) तसेच शहामृग पक्ष्यांमध्ये सहसा रोगाची कोणतीही लक्षणे दिसुन येत नाहीत. तथापी अशी बाधित जनावरे, पक्षी या विषाणुंचे वाहक म्हणुन कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे बाधित जनावरांचे मांस खाल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व किटकांच्या (गोचिड, पिसवा, डास इ.) दंशामुळे या रोगाचा मानवांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मानवांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसुन आले आहे व या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित व्यक्तीपैकी तीस टक्क्यांपर्यंत व्यक्ती त्वरीत निदान व उपचार न झाल्यास मृत्यु पावण्याची शक्यता असते. या विषाणुजन्य रोगाविरुध्द प्रभावी व हमखास उपयुक्त असे उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाह्य किटकांचे उच्चाटन करणे ही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे.

ही आहेत लक्षणे...
या रोगाने बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये सुरवातीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे वगैरे लक्षणे दिसुन येतात. आजारी व्यक्तींचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसु लागतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतुन रक्तस्त्राव अशी विविध लक्षणे दिसुन येतात. काही रुग्णांमध्ये काविळसारखी लक्षणे दिसतात. या रोगामध्ये मृत्युचे प्रमाणे नऊ ते तीस टक्के इतके असु शकते. सीसीएचएफ रोगाची लागण प्रामुख्याने ज्या व्यक्तिचा व्यावसायीक कारणामुळे संक्रमीत पशुंशी संपर्क येतो; अशा व्यक्तीना होण्याची शक्यता जास्त असते.
 
अशी घ्‍या काळजी
महाराष्ट्र गुजरातच्या लगत असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राज्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी उपाय योजना करण्याचा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. खबरदारीची उपाय योजना म्हणुन जनावरांवरील शेळ्या- मेंढ्यावरील व गोठ्यातील गोचिड आणि किटकांचे उच्चाटन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बाह्य किटकांचा गोचिडांचा नाश करणाऱ्या औषधांची जनावरांवर तसेच गोठ्यांमध्ये इतरत्र योग्य प्रमाणात फवारणी करणे करावी. पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकरी, दुग्ध व्यावसायीक, शेळी- मेंढी पालक यांचे विस्तृत प्रमाणावर प्रबोधन करणे आवश्यक आहे. सदर रोगाचा प्रसार गोचिडांशी संपर्क आल्याने होत असल्याने गोचिड्या हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे. तसेच गोचिड चावणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. सदर रोग पशुंचे कच्चे मांस खाल्ल्याने होवु शकतो. त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे. बाहेरुन आलेल्या जनावरांची तपासणी करुन त्यांचे अंगावर गोचिडे असल्यास त्यांना कळपापासुन वेगळे करुन त्यांचेवर ताबडतोब प्रतिबंधक औषधे फवारणी करण्यात यावी. 

गुजरातमधून मोठ्या प्रमाणात खरेदी
गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात राज्यात गीरगाई, मेहसाना व जाफ्राबादी म्हशी तसेच शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे येत असतात. हा आजार गुजरात राज्यातील कच्छ व बोताड जिल्ह्यांमध्ये नियंत्रणात येत नाही; तोपर्यंत गुजरात राज्यातील या जिल्ह्यांमधुन गाई, म्हशी तसेच शेळ्या- मेंढ्या खरेदी करणे किंवा सांभाळ करण्यासाठी चारण्यासाठी आणणे संयुक्तिक राहणार नाही. कत्तलखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्राण्यांच्या रक्ताची मांसाची अथवा इतर द्रवाशी थेट संपर्क येणार नाही. यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. कत्तलखान्यात स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.

संपादन ः राजेश सोनवणे