coronavirus : कोरोनाच्या भितीने परतणाऱ्यांना धक्का; खासगी ट्रॅव्हल्सने केली भाडेवाढ 

travhal
travhal

शहादा  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात सर्वत्र प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परिणामी शाळा महाविद्यालयाला सुट्टी असल्याने पुण्यात शिक्षणासाठी गेलेले शेकडो विद्यार्थी, कुटुंबे गावाकडे परतू लागली आहेत. यापार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही संधी साधून भाडेवाढ केली आहे. आपत्ती व्यवस्थापनावेळी मदतीऐवजी खासगी बससेवा संधीच्या फायदा घेत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त होत आहे. 

नगरपालिका ,महापालिका क्षेत्रातील शाळांना शासनाने ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. शहादा तालुक्यातील बरीचशी कुटुंब रोजगारासाठी तर काही शिक्षणासाठी पुणे शहरात वास्तव्यास आहेत. सुट्टी असल्याने सर्वच आपापल्या गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने संधीचा फायदा घेत ४०० ते ५०० रुपये भाडे वाढ केल्याचे समजते. 

पुण्याला दररोज १० बस 
तालुक्यातून शेकडो कुटुंबे पुण्यात विविध कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहादा शहरातून दररोज पुण्याला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या सरासरी १० बस ये-जा करतात. एरवी शहादा ते पुणे ५०० ते ६०० रुपये तिकिटाचा दर असतो. जाण्यासाठी तोच दर कायम असला तरी पुण्याहून परतण्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. तब्बल ८०० ते ९०० रुपये दर झाल्याचे प्रवासी सांगतात. तेही अगोदर बुकींग करावे लागते. सध्या गर्दी झाल्याने बुकिंग भेटत नाही तोच फायदा उचलत दरात वाढ होत आहे. 

अशी होते भाडेवाढ 
ट्रॅव्हल्स एजन्सीकडे प्रवासी आल्यानंतर निश्चित प्रवासाच्या तिकिटाची विचारणा करतो, त्यावेळी समजा पुणे शहादा प्रवासाची विचारणा केली तर त्याला सध्या सुट्टी असल्याने फुल असल्याचे सांगितले जाते. ठराविक तिकिटे शिल्लक असल्याचे सांगून अधिक दर सांगितला जातो, आत्ताच बुक केले तर हा दर आहे उद्याचे सांगता येत नाही, दर आणखी वाढू शकतो असे सांगून बुकिंग केली जाते. 

परतणाऱ्यांची तपासणी गरजेची 
शहरात पुण्याहून दररोज दहा बस येतात त्यातून शेकडो प्रवासी शहरात, तालुक्यात येत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड भागात संशयित रुग्णांची संख्या पाहता तसेच आठ ते दहा तास प्रवासादरम्यान एकमेकांशी संपर्क नाकारता येत नाही. त्यामुळे त्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी होणे गरजेचे आहे. खासगी बस थांबा असलेल्या जागेवर एक वैद्यकीय पथक नियुक्त करून त्यांची तपासणी करावी अशी मागणी जनमानसातून केली जात आहे. 

या उद्भवलेल्या कठिण प्रसंगात प्रत्येक जण आपापल्या परीने सहकार्य करीत आहे. आपलेच बांधव शिक्षणासाठी बाहेरगावी गेले आहेत, त्यामुळे ते घराकडे यायला निघाले. खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढ न करता सामाजिक बांधिलकी जपत या कठिण प्रसंगात माणुसकी ठेऊन मदतीचा हात दिला पाहिजे. 
अजित बाफना, सामाजिक कार्यकर्ते, शहादा 

सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याने मुलाबाळांना गावाची ओढ लागली आहे, परंतु खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीने दरात वाढ केली आहे. एरवी दिवाळी, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये भाडे वाढ समजू शकतो. परंतु आपत्ती वेळी निदान अचानक भाडेवाढ करू नये. 
प्रशांत पाटील, पुणे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com