esakal | तामिळनाडूतील ‘दिशा’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायदा ः गृहमंत्री देशमुख 
sakal

बोलून बातमी शोधा

home minister anil deshmukh

तामिळनाडू मध्ये असलेल्या दिशा कायद्याचा धर्तीवर नवा कायदा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या अधिवेशनापर्यंत तो मंजूर करू यासाठी प्रयत्नशील आहे.

तामिळनाडूतील ‘दिशा’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायदा ः गृहमंत्री देशमुख 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहादा (नंदुरबार) : सारंगखेडा (ता. शहादा) येथील अल्पवयीन मुली बाबत घडलेली घटना दुर्दैवी असून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल तसेच या प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांनाच सरकारी वकील म्हणून ही केस चालवण्याची नेमणूक करण्यात येईल. राज्यात अल्पवयीन मुली तसेच महिलांबाबत घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना वचक बसावा यासाठी राज्य शासन तामिळनाडू मध्ये असलेल्या दिशा कायद्याचा धर्तीवर नवा कायदा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या अधिवेशनापर्यंत तो मंजूर करू यासाठी प्रयत्नशील आहे.असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
गृहमंत्री अनिल देशमुख आज शहादा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात मुली तसेच महिलांबाबत अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सारंगखेड्याच्या बाबतीत पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी तसेच जिल्ह्याचे खासदार, आमदारांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून ॲड. उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून ॲड. उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात येईल. राज्यात घडणाऱ्या या दुर्दैवी घटनांना वचक बसावा, यासाठी राज्य शासनाला कडक कायदा कसा करता येईल. म्हणून मधल्या काळात तामिळनाडूला गेलो होतो. तेथील दिशा कायद्याचा अभ्यास केला. त्याच धर्तीवर नवीन कायदा महाराष्ट्रात आणू, त्यामुळे दोषींवर लवकरच कडक कारवाई करणे सोपे जाईल. तसेच घटनेच्या तपासही लवकरच लागेल. जिल्ह्याच्या विस्तार व घडणाऱ्या घटना पाहता नवीन तीन पोलीस ठाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत बोलतांना ते म्हणाले, लवकरच तिन्ही पोलिस ठाण्याच्या निर्मितीबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून लवकरच मंजुरी देऊ, असे सांगितले. 

भाजप नेत्यांची पायाखालची वाळू सरकू लागली
महाआघाडी शासनाच्या कार्यकाळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री देशमुख म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. अगदी समन्वयाने कामकाज सुरू आहे .तीनही पक्षांचे नेते एकत्रित येऊन निर्णय घेतात. परंतु भाजपच्या नेत्यांची पायाखालची वाळू आता घसरायला लागली आहे. विरोधी पक्ष या ना त्या अफवा पसरवत आहेत. महाआघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पक्षाच्या गटबाजी बाबत श्री देशमुख म्हणाले की, प्रत्येक पक्षात गटबाजी असते, परंतु या गटबाजीला थारा न देता पक्षवाढीसाठी सगळ्यांनी एकत्रित काम सुरू केले आहे. 
 
देशमुखांनी उत्तर टाळले 
भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली का? असा खोचक प्रश्न ट्विटरवर विचारला आहे. याबाबत त्यांना विचारले असता उत्तर देणे टाळले.