esakal | कोणी..ऑक्सिजन सिलिंडर देत का ?

बोलून बातमी शोधा

oxygen
कोणी..ऑक्सिजन सिलिंडर देत का ?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे: शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनयुक्त ६० बेडच्या निर्मितीचे काम पूर्ण होऊन १५ दिवस झाले आहेत. मात्र ऑक्सिजन सिलिंडरच नसल्याने कोविड सेंटरचा प्रत्यक्ष रुग्णांना लाभ घेता येत नसल्याचे चित्र आहे. तसेच येथे ऑक्सिजनयुक्त बेड निर्मितीवर लाखो रुपये खर्च करूनही काही उपयोग होत नसल्याने लोकप्रतिनिधींसह सर्वच राजकीय पक्ष, प्रशासन व आरोग्य विभागाने पाठ फिरविली आहे. या मुळे आता सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनांनीच पुढाकार घेऊन ऑक्सिजनयुक्त भरलेले सिलिंडर उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: कोरोनामूळे रेशन धान्य दुकानांच्या तपासणीला ब्रेक !

शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर हे गेल्या वर्षापासून समाजकल्याण विभाग वसतिगृह येथे सुरू आहे. शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती व्हावी. त्यानुसार २० मार्चला जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ६० ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मितीचे आदेश देऊन निधी मंजूर केला. त्यातून ऑक्सिजन बेडचे काम ९ एप्रिलला पूर्ण झाले; पण ऑक्सिजनचे भरलेले सिलिंडर न मिळाल्याने ते अद्याप वापरात येऊ शकले नाही. या मुळे दोंडाईचा येथील हस्ती बॅंकेने पाच रिकामे सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. मात्र आता जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना व उद्योगपती यांनी भरलेले सिलिंडर उपलब्ध करून कोरोना संसर्गजन्य रुग्णांचे हाल थांबविण्याची गरज आहे. ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाल्यास शिंदखेडा शहरासह ५० ते ६० गावांतील कोरोना रुग्णांची होरपळ थांबणार आहे.

हेही वाचा: एमआयडीसीतील जागेसह ‘ऑक्सिजन’साठी ८० लाख

तालुक्यातील डॉक्टरांनी पुढे यावे

शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे एमबीबीएस, एमडी व एमएस वैद्यकीय अधिकारी नसल्याने सेंटर सुरू होऊ शकले नाही. तालुक्यात एमबीबीएस, एमडी व एमएस शिक्षण पूर्ण केले व शिकत असलेल्या डॉक्टरांनी पुढे येवून तालुक्यातील कोरोना संसर्गजन्य रुग्णांवर उपचार केल्यास खऱ्या अर्थाने आपण तालुक्यातील जनतेचे देणे लागतो, याची फेड होणार आहे. या मुळे समाजाचे व्रत घेतलेले डॉक्टरांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे