"वारी चुकेल रे हरी...'! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

जिल्ह्यातून शिंदखेडा येथील श्रीराम बालाजी संस्थान, बाळदे (ता. शिरपूर) येथील श्री तापी परिसर विठ्ठलधाम संस्थान, लामकानी (ता. धुळे) येथील विठ्ठल मंदिर संस्थान आदी संस्थानांतर्फे दर वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पायी दिंड्या जातात.

शिंदखेडा : वारकरी संप्रदायाचा मानबिंदू असलेल्या, श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस उरी बाळगत शेकडो किलोमीटर पायपीट करत दर वर्षी आषाढीला जिल्हाभरातून रवाना होणाऱ्या वारकरी दिंड्या यंदा "कोरोना' महामारीच्या सावटामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो वर्षांची दिंड्या, पालख्यांची ही परंपरा खंडित होणार आहे. यामुळे "वारी चुकेल रे हरी..' अशी भावनाच वारकऱ्यांसह संबंधित दिंडी नेणाऱ्या संस्थानांच्या महाराजांकडून व्यक्त झाली. 
जिल्ह्यातून शिंदखेडा येथील श्रीराम बालाजी संस्थान, बाळदे (ता. शिरपूर) येथील श्री तापी परिसर विठ्ठलधाम संस्थान, लामकानी (ता. धुळे) येथील विठ्ठल मंदिर संस्थान आदी संस्थानांतर्फे दर वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पायी दिंड्या जातात. या दिंड्यांमध्ये जिल्हाभरातील विविध गावांतील पालख्यांसह हजारो वारकरी सहभागी होतात. पांडुरंगाच्या महाभक्तांचा हा मेळा मजल-दरमजल करत वर्षानुवर्षे त्या- त्या संस्थानांच्या प्रमुख महाराजांसह श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना होतो. यंदा मात्र या दिंड्या, पालखींवर कोरोनाचे संकट उद्‌भवले असून, प्रथमच शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या दिंड्या रद्द झाल्या आहेत. 

शिंदखेड्याची दिंडी रद्द 
शिंदखेडा येथील श्रीराम बालाजी संस्थानच्या दिंडीला तब्बल 128 वर्षांची परंपरा असून, दर वर्षी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणारी (वै.) नाना महाराज दिंडी यंदा स्थगित झाली आहे. संस्थानतर्फे दर वर्षी आषाढी एकादशीच्या एक महिना आधी पंढरपूरकडे ही दिंडी रवाना होत असे. तीत सुमारे 300 ते 350 वारकरी सहभागी होतात. सुरवातीच्या काळात येथून उपलब्ध साधनांद्वारे (कै.) रामदास बुवा यांनी 11 वर्षे, (कै.) रंगनाथ बुवा यांनी 13 वर्षे, नथू बुवा यांनी 11 वर्षे, अशी एकूण 35 वर्षे मिळेल त्या साधनांनी पंढरपूरला दिंडी नेली. त्यानंतर (वै.) नारायण बुवा (नाना महाराज) यांनी 47 वर्षे, त्यांच्यानंतर सखाराम बुवा ऊर्फ सखाराम महाराजांनी 52 वर्षे दिंडी नेली. सध्याचे मठाधिपती मेघश्‍याम बुवा महाराज यांनी 29 वर्षे दिंडीची परंपरा जोपासली. 128 वर्षांची ही दिंडी यंदा शिंदखेडा येथून चार जूनला येथून प्रस्थान करणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे शासनाने सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने ही दिंडी यंदा स्थगित करण्यात आली. शासन निर्णयानुसार पुढील नियोजन करणार असल्याचे संस्थानचे मठाधिपती मेघश्‍याम बुवा यांनी "सकाळ'ला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda aashadhi pandhrpur wari cancal corona