"सीसीआय' केंद्रांवरील कापूस खरेदीचा वेग वाढवा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

ऑनलाइन' नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मोठी संख्या पाहता ही खरेदी अशीच संथ सुरू राहिली, तर कापूस कुठे आणि कसा विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. 

शिंदखेडा ः राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाच केंद्रांवर "सीसीआय'तर्फे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. मात्र, ती अतिशय संथगतीने सुरू असून, पावसाळा सुरू होण्यास राहिलेला कमी कालावधी लक्षात घेता "सीसीआय' केंद्रांवरील कापूस खरेदीचा वेग वाढवावा, त्यासाठी खासगी "जिनिंग'वर खरेदीची सोय करावी, अशी मागणी धुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. 

मागण्यांबाबत तालुका उपनिबंधक एस. एस. गिते यांना कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असताना शेतकऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील हजारो क्विंटल कापूस घरातच पडून आहे. "कोरोना'च्या संसर्गामुळे ही स्थिती उद्‌भवल्याने यंदा सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू होण्यास उशीर झाला.

लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने जिल्ह्यासाठी पाच केंद्रांवर सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकऱ्यांना "ऑनलाइन' नोंदणी करावी लागत आहे. मात्र, खरेदी केंद्रांवर सीसीआयतर्फे रोज फक्त 30 ते 35 वाहनांतील कापसाचीच मोजणी होत आहे. "ऑनलाइन' नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मोठी संख्या पाहता ही खरेदी अशीच संथ सुरू राहिली, तर कापूस कुठे आणि कसा विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पाचही सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर रोज किमान 100 वाहनांतील कापूस खरेदीसह मोजण्याची व्यवस्था त्वरित करावी, सर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस मोजला जाईल, याची खबरदारी घ्यावी आदी मागण्या केल्या. श्री. गिते यांनी सीसीआयचे अधिकारी, जिनिंग मालकांशी त्वरित संपर्क साधत कापूस मोजणीचा वेग वाढविण्याची सूचना केली. माजी आमदार पाटील यांनी मका खरेदीची प्रक्रियाही तातडीने सुरू करण्याची विनंती केली. श्री. सनेर यांनी सांगितले, की तालुक्‍यातील 1200 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून, प्रत्यक्षात मोजणी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यामुळे तातडीने मका खरेदीही सुरू करावी, अशी मागणी आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda Accelerate cotton procurement at CCI centers