Vidhan sabha 2019 : जलसंधारण, रोजगारासह शेतीपूरक उद्योग उभारणार : शिरीष चौधरी 

Vidhan sabha 2019 : जलसंधारण, रोजगारासह शेतीपूरक उद्योग उभारणार : शिरीष चौधरी 

रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष व समाजवादी पक्ष आघाडीचे उमेदवार शिरीष चौधरी यांनी केले. ‘सकाळ’शी संवाद साधताना ते बोलत होते. केळी उत्पादक शेतकरी हा या मतदारसंघाचा आत्मा आहे. त्यांच्या समस्या सोडवून केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले. 

आपली उमेदवारी नेमकी कशासाठी आहे, या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, रावेर, यावल परिसर हा एक संपन्न, समृद्ध मानला जाणारा भाग आहे. शेतीत प्रचंड कष्ट करून शेतकरी सोने पिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, तसेच तरुण, महिला यांचेही अनेक प्रश्न अजून दुर्लक्षित आहेत. ते सोडविण्याचा प्रयत्न करून या विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे ही माझी भावना आहे. माझे वडील लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांनी खूप मोठे काम या मतदारसंघात केले आहे. त्यांच्यासह माजी मंत्री जे. टी. महाजन, माजी आमदार बाजीराव नाना पाटील आदींनी या मतदारसंघाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर 
मतदारसंघातील समस्यांबाबत श्री. चौधरी म्हणाले, की जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आपण तालुक्यातून प्रत्येक गावातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यादरम्यान भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खालावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांचे नुकसान झाले आहे. तरुणांमधील बेरोजगारीची समस्या मोठी आहे. महिलांचे आरोग्य व सबलीकरणाचीही गरज आहे. अनेक गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही तसेच रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाचा, शाळांचा दर्जा वाढवून आनंददायी शिक्षण मिळाल्यास या पिढीला चांगले भवितव्य लाभणार आहे. 

समस्या सोडविण्यावर भर 
श्री. चौधरी म्हणाले, की भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी गावागावातील नाले, चाऱ्या खोल करणे, नदी-नाल्याच्या पात्रात चर घालणे, बांध घालणे, विहिरी खोदणे असे कार्यक्रम करावे लागतील. रोजगार निर्मितीसाठी छोटे-छोटे प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय यांना चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज आहे. शाळांमध्ये अध्ययन, अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर विद्यार्थ्यांचे आकलन वाढू शकेल. तसेच आदिवासी गावांमधून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. 

असा आहे जाहीरनामा 
जाहीरनाम्याबाबत श्री. चौधरी म्हणाले, की मतदारसंघात जिथे कालवे नाहीत त्या धरणांमधून पाइपलाइनद्वारे शेतीला पाणी देणे, लोकसहभागातून जलसंधारण, मोर धरणालगत सौरऊर्जा निर्मिती केंद्र उभारणी, शाळांमध्ये इ-लर्निंग सुविधा, युवकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळावा या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, त्यांना मालाचे उत्पादन, प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता व विक्री याबाबतचे शिक्षण देणे, क्रीडा संकुले पूर्ण करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे, बंद उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणे, मागासवर्गीय, आदिवासी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबवणे, पाल, रावेर, फैजपूर, यावल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, लोकसहभागातून वृक्ष लागवड- वृक्ष संवर्धन करणे या बाबींवर आपण भर देणार आहोत. 

जनता आपल्या पाठिशी 
काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या जाहीरनाम्यात देखील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता, पदवीपर्यंत मोफत शिक्षण, सर्व नागरिकांना आरोग्य विम्याच्या कक्षेत आणणे, स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन करणे, उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनासाठी ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा कायदा करणे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे काँग्रेसच्या कामांमध्ये सहभागी आहेत. या शपथनामामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष,कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आपल्याला निश्चितच विजय मिळेल, असा विश्वास श्री. चौधरी यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com