गावोगावच्या वेशींवर काटे; गल्ल्यांत मात्र जत्रा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

"कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी संशयित व्यक्तीच्या घराच्या आजूबाजूचा परिसर "सील' करून क्वारंटाइन केला जातो. मात्र, अतिरिक्त उत्साही मंडळींनी आपल्या गल्लीत फेरीवाले व इतर आगंतुकांची ये- जा बंद करण्यासाठी मुख्य रस्त्यांवर काटे, वाहने लावून प्रवेशबंदी केली आहे.

शिरपूर : "कोरोना'च्या वाढत्या संसर्गामुळे स्वतःसह परिसर "क्वारंटाइन' करण्याच्या आवेशात एकीकडे गावातील प्रवेशाचे मार्ग काटे टाकून बंद केले. दुसरीकडे मात्र गल्लीबोळांत "सोशल डिस्टन्सिंग' न पाळता सर्व निकष धुडकावून प्रचंड गर्दी केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील या विरोधाभासामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

हेही पहा - कोरोनाने हिसकावला तयार शेतमालाचा घास 

"कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी संशयित व्यक्तीच्या घराच्या आजूबाजूचा परिसर "सील' करून क्वारंटाइन केला जातो. मात्र, अतिरिक्त उत्साही मंडळींनी आपल्या गल्लीत फेरीवाले व इतर आगंतुकांची ये- जा बंद करण्यासाठी मुख्य रस्त्यांवर काटे, वाहने लावून प्रवेशबंदी केली आहे. शहरातील विविध वस्त्यांसह ग्रामीण भागातील गावांमध्येही ही पद्धत अवलंबून परिसर विलगीकरण केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बलपूर्वक वाहतूक रोखणे नियमबाह्य असले. तरी पोलिस व प्रशासनाने त्याकडे काणाडोळा केला. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन किंवा अजाणतेपणी संबंधितांकडून "सोशल डिस्टन्सिंग'च्या दक्षतेला हरताळ फासला जात आहे. वेशीवर प्रवेशबंदी करून परिसर "कोरोना'मुक्त केल्याच्या थाटात स्थानिक रहिवासी सायंकाळी एकत्र जमून गप्पा ठोकणे, ग्रुप करून गल्ल्यांमध्ये फिरणे, क्रिकेटसारखे खेळ खेळणे अशा उद्योगांत गढलेले दिसून येतात. त्यामुळे संभाव्य संसर्ग फोफावण्याची दाट शक्‍यता व्यक्त होत आहे. 

पोलिसांचा नाइलाज 
शहर व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी- कर्मचारी मुख्य रस्ते, सीमावर्ती भागातील नाके येथील बंदोबस्तात गुंतले आहेत. त्यांच्यावरील ताण मोठा आहे. त्यामुळे गल्लीबोळांत काय घडते, याकडे लक्ष देण्यासाठी पोलिस बळाची उणीव जाणवते. त्याचा गैरफायदा घेऊन गल्लीबोळांत यात्रेप्रमाणे गर्दी होत आहे. 

वाहनधारक त्रस्त 
सोयीच्या रस्त्यांवर टाकलेल्या अडथळ्यांमुळे दुचाकीधारकही त्रस्त झाले आहेत. अत्यावश्‍यक कामांसाठी बाहेर पडताना त्यांना लांब अंतरावरून जाणे भाग पडते. परिसर क्वारंटाइन करण्याचा हेतू साध्य तर होत नाहीच, उलट संसर्गाची भीती आणखी वाढत असेल, तर असे अडथळे काढून टाकावेत, मुख्य रस्त्यांप्रमाणेच गल्लीबोळातही पोलिसांनी फेरफटका मारून सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur corona social distancing not follow villages