esakal | बोंडे सडल्याने कपाशीच्या शेतात रोटाव्हेटर; बोंडअळीचा प्रादुर्भाव 
sakal

बोलून बातमी शोधा

cotton farm

बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी विभागाने विशेष मोहीम राबवली. जेथे प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी आहेत, तिथे पाहणीसाठी मंडलाधिकारी, कृषी सहाय्यकांना पाठवत आहोत. तातडीच्या उपाययोजनेसाठी काय करता येईल, याबाबत वरिष्ठांना सूचित केले आहे. 
-अनिल निकुंभ, तालुका कृषी अधिकारी, शिरपूर

बोंडे सडल्याने कपाशीच्या शेतात रोटाव्हेटर; बोंडअळीचा प्रादुर्भाव 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : अतिवृष्टीमुळे कपाशीची बोंडे सडल्याने उत्पन्नात मोठी घट आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांपुढे बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे गंभीर संकट उभे राहिले आहे. पहिल्या वेचणीत जेमतेम उत्पन्न मिळाले. बोंडअळीमुळे आगामी उत्पादनही गेल्यात जमा आहे. त्यामुळे उभ्या कपाशीच्या पिकात रोटाव्हेटर फिरवण्यास काही शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. 
शिरपूर खुर्द व बुद्रुक शिवारात बोंडअळीचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. शिरपूर मंडलात २२ ऑक्टोबरअखेर एकूण ९६५ मिलिमीटर पाऊस झाला. अतिरिक्त पावसामुळे कपाशीची बोंडे मोठ्या प्रमाणात खराब झाली. पहिल्या वेचणीत कापूस उत्पादकांना एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस मिळाला. लागवड खर्चही भरून निघत नसल्यामुळे शेतकरी दुसऱ्या वेचणीच्या प्रतीक्षेत असतानाच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उरलेसुरले उत्पन्नही हातून निसटण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानाची वाट पाहण्यापेक्षा पुढील हंगामासाठी शेत उपलब्ध व्हावे, म्हणून काही शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीत रोटाव्हेटर फिरवण्यास सुरवात केली. 
बोंडअळीचे संभाव्य संकट लक्षात घेऊन येथील कृषी विभागाने शेतीशाळांच्या माध्यमातून उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजनाही केल्या. मात्र, सातत्याने अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात चिखल झाला. परिणामी, शेतात जाण्यास वाटही शिल्लक न राहिल्यामुळे तातडीचे उपाय करणे शक्य झाले नाहीत. बोंडअळी वाढत जाऊन मोठ्या क्षेत्रात विस्तारली. आजमितीस संपूर्ण शिवारात कपाशीचे पीक बोंडअळीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

पंचनाम्याची मागणी 
बोंड सडल्याने आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या एकरी उत्पन्नात कमालीची घट झाली. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आदींसाठी झालेला खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. पुढील हंगामाची तजवीज करताना शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बोंडअळीमुळे झालेल्या हानीचा पंचनामा करून शासनाकडे नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 
 
कपाशीची बोंडे सडल्याने मोठे नुकसान झाले. एकरी उत्पन्नात प्रचंड घट झाली. हाती आलेल्या कापसाची गुणवत्ता पाहता अत्यंत कमी दर मिळणार आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठीही शेतकऱ्यांकडे पैसा नसेल. शासनाने तातडीची मदत घ्यावी. 
-कैलास पाटील, शेतकरी 
 

संपादन ः राजेश सोनवणे