बनावट नोटांच्या छापखान्याची लिंक बुलढाण्यापर्यंत; समोर येणार सत्‍य

सचिन पाटील
Friday, 30 October 2020

घरात बनावट नोटा छापण्यासाठीचे साहित्य आढळले. अत्याधुनिक कलर प्रिंटर्सच्या साह्याने नोटा छपाईचा हा उद्योग सुरु होता.

शिरपूर (धुळे) : बनावट नोटा छापण्यासाठी अद्ययावत साधनांचा वापर करुन छापखाना चालवणाऱ्या बेलदार अँड कंपनीचे धागेदोरे थेट बुलढाण्यापर्यंत भिडले असून या कनेक्शनचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले आहे. शिरपूर-बुलढाणा या प्रवासाचा ट्रॅक हुडकल्यानंतर वितरित केलेल्या बनावट चलनापैकी बराचसा मुद्देमाल हाती येण्याची शक्यता आहे. 
कळमसरे (ता.शिरपूर) येथे 27 ऑक्टोबरला छापा टाकून पोलिसांनी संशयित संतोष बेलदार व गुलाब बेलदार या बापलेकांना अटक केली. त्यांच्या घरात बनावट नोटा छापण्यासाठीचे साहित्य आढळले. अत्याधुनिक कलर प्रिंटर्सच्या साह्याने नोटा छपाईचा हा उद्योग सुरु होता. या गुन्ह्यातील टेक्निकल मास्टर माइंड मनोज तथा विनोद जाधव व मंगल बेलदार हे दोन संशयित फरारी आहेत. 

कच्चा माल कोणी दिला 
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात बाँडपेपरसह विविध साहित्याचा समावेश आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता संशयितांनी जाणीवपूर्वक 200 रुपये दराच्या नोटा छापल्या असल्याचे स्पष्ट होते. कमी किंमतीच्या नोटांची खातरजमा करण्याची फारशी तसदी घेतली जात नाही असा विचार त्यामागे असण्याची शक्यता आहे. नोट छापतांना तिच्या सेंटर फोल्डपासून अर्धा सेमी अंतरावर असलेली सहा होलोग्रामची बनावट पट्टीही संशयितांनी लावल्याचे आढळले. अत्यंत कौशल्याने तयार केलेली ही सामुग्री संशयितांनी कोठून मिळवली याचा तपास केल्यास अशा अनेक टोळ्यांना कच्चा माल पुरवठा करणार्‍यांची साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

वितरकाचा शोध 
प्रारंभिक तपासात बनावट नोटांचे धागेदोरे बुलढाण्यापर्यंत असल्याचे निष्पन्न झाले. या उद्योगात सहभागी असलेल्यांचा शोध पोलिस घेत आहेत. संशयित संतोष बेलदार याने यापूर्वी बरेचसे उद्योग केले असून तेव्हापासून त्याचा बुलढाणा परिसरातील गुन्हेगारांशी संपर्क असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur counterfeit notes printing linkup buldhana