बोगस डॉक्‍टरकडे लाखोंचा औषधसाठा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

शिरपूर : कोडीद (ता. शिरपूर) येथे अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करताना आढळलेल्या बोगस डॉक्‍टर्सपैकी दोघांना शिरपूर न्यायालयाने आज तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. उर्वरित एक संशयित फरार असून, एकास वैद्यकीय समस्येमुळे अटक केलेली नाही. दरम्यान, या बोगस डॉक्‍टरकडे लाखोंचा औषधसाठा सापडलेला आहे. 
 
कोडीद परिसरातून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर काल तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी यांनी धडक मोहीम राबवून तीन बोगस डॉक्‍टर्सला ताब्यात घेऊन लाखो रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला होता. त्यात ताजुद्दीन कमरुद्दीन शेख, आसिफ युसूफ पिंजारी व राकेश शंकरलाल भद्रावाले यांना ताब्यात घेऊन सांगवी पोलिसांत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एक अन्य संशयित सादिक शब्बीर लोहार हा फरार झाला. त्यातील संशयित राकेश भद्रावाले याला किडनी व मधुमेहाच्या विकारामुळे डायलिसीसवर ठेवण्यात आले आहे. ताजुद्दीन शेख आणि आसिफ पिंजारी यांना 30 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 
 
लाखोंचा औषधसाठा जप्त 
कोडीद येथे संशयित ताजुद्दीन शेख याच्या दवाखान्यात असलेला औषधसाठा पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथकही आश्‍चर्याने थक्क झाले. सुमारे साडेतीन लाख रुपयांची इंजेक्‍शन्स, विविध औषधी तेथे भरलेली होती. एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असावीत, तशी औषधी तेथे ठेवलेली होती. कारवाईदरम्यान पोलिस आणि अधिकाऱ्यांना तेथील महिलांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. त्यांना महिलांनी धमकावले, मात्र शिताफीने ताजुद्दीनला ताब्यात घेऊन पथक सांगवीला पोचले. परिसरात आणखी काही बोगस डॉक्‍टर्स कार्यरत असून काल झालेल्या कारवाईनंतर ते फरार झाले असल्याचे कळते.

Web Title: marathi news shirpur frode docter