अतिवृष्टीमुळे शिरपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा 

सचिन पाटील 
Friday, 25 September 2020

वादळासह अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्वच महसूल मंडळातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.

शिरपूर : तालुक्यात वादळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदतीसाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार काशीराम पावरा व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

वाचा ः  कोणी फुकटात चारा घेता का ! शेतकऱयाने सोशल मीडियावर लढविली शक्कल
 

आमदार पावरा यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले. तालुक्यात २० सप्टेंबरला सायंकाळी वादळासह अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्वच महसूल मंडळातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. ऊस, कपाशी, पपई, सोयाबीन, केळी, ज्वारी, बाजरी, मका आदी खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला.

 

आवश्य वाचा ः 'पाऊस सुसाट पण शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट' !  
 

बळीराजाला दिलासा देण्यासाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य बबन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, संचालक अविनाश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, संजय आसापुरे, पिळोद्याचे योगेश बोरसे, माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील, वाघाडीचे माजी सरपंच अ‍ॅड. प्रतापराव पाटील, खर्दे पाथर्डेचे सरपंच सुनील पाटील, जगन्नाथ पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष विक्की चौधरी, जितू सूर्यवंशी, मंगेश पाटील आदींनी निवेदनातून केली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur Heavy rains have caused huge losses to farmers and declare a wet drought