esakal | मातृपितृ छत्र हरपलेल्या जान्हवीचे आमदारांनी केले कन्यादान
sakal

बोलून बातमी शोधा

mla anil patil

श्रीक्षेत्र नागेश्वर (ता. शिरपूर) येथे बुधवारी जान्हवी आणि राहुल यांचा विवाह पार पडला. मंत्रोच्चारात कन्यादानाचा विधी सुरु झाला. वधूपिता म्हणून कन्यादानासाठी आमदार अनिल पाटील उभे राहिले.

मातृपितृ छत्र हरपलेल्या जान्हवीचे आमदारांनी केले कन्यादान

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : लोकप्रतिनिधींचे कार्य व्यापक असावे अशी जनतेची अपेक्षा असते पण कधी कधी त्यांच्या सामाजिक जीवनाला मानवतेची अभिमानास्पद किनारही असते, याचा प्रत्यय बुधवारी (ता. २) अमळनेर आणि शिरपूर तालुक्यातील रहिवाशांना आला. आईबापावेगळ्या मुलीचा सांभाळ करीत तिच्यावर मायेचे छत्र धरून एका आदर्श पित्याप्रमाणे अनुरुप वराशी विवाह करून देत कन्यादानही करणारे अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांच्याविषयी प्रत्येकाचा आदर दुणावला. 

श्रीक्षेत्र नागेश्वर (ता. शिरपूर) येथे बुधवारी जान्हवी आणि राहुल यांचा विवाह पार पडला. मंत्रोच्चारात कन्यादानाचा विधी सुरु झाला. वधूपिता म्हणून कन्यादानासाठी आमदार अनिल पाटील उभे राहिले. जान्हवी त्यांची मानसकन्या आहे. ती लहान असतानाच अहमदाबाद (गुजराथ) येथे असणाऱ्या तिच्या आईवडिलांचे निधन झाले. तिला सांभाळण्याची जबाबदारी अमळनेर येथील वृद्ध आजीच्या खांद्यांवर पडली. दुर्दैवाने काही वर्षांनी आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बाब अनिल पाटील यांना कळली. त्यांनी जान्हवी लहान असतांनाच तिचे पालकत्व स्वीकारले. तिच्याप्रति असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. विवाहयोग्य वय झाल्यानंतर तिच्यासाठी वरसंशोधन सुरू केले. आमदार पाटील यांच्या नात्यातील विखरण (ता. शिरपूर) येथील सुरेश धनगर पाटील यांचा मुलगा राहुल अनुरूप वर असल्याचे पाहून विवाह निश्चित केला. कोरोना साथसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागेश्वर येथे निवडक नातलगांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राहुल पाटील पुणे येथे वॉटर फिल्टरच्या व्यवसायात आहे. आमदार पाटील यांच्या कर्तव्यपरायणतेचा उपस्थितांनी गौरव केला.   
 
कन्यादानाचे साकडे 
कन्यादान विधी आटोपल्यावर व्याही सुरेश पाटील यांना उद्देशून आमदार पाटील यांनी साकडे घातले. माझ्या परीने जान्वहवीची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तिच्या संगोपनात काही उणिवा राहिल्या असतील तर आपण सासऱ्यांऐवजी पित्याची भूमिका स्वीकारून समजून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. ते पाहून उपस्थित भारावले. 

संपादन ः राजेश सोनवणे