शिक्षक, मुख्याध्यापक कोरोनाच्या फेऱ्यात; शाळेबाबत प्रश्‍नचिन्हच 

coronavirus
coronavirus

शिरपूर (धुळे) : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू असतानाच शहर व परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, आश्रमशाळांचे शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना वर्गात पाठवणे कितपत सुरक्षित आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 
माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या. त्यात मोठ्या संख्येने अहवाल निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख तळाशी आला. मात्र, तीन दिवसांत रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट व आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये खासगी शाळेचे मुख्याध्यापक, आश्रमशाळेचे शिक्षक कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सूक्ष्म नियोजन कितीही अद्ययावत असले, तरी कोरोनाचा संसर्ग कायम राहील, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर वर्ग सुरू केल्यानंतर न टाळता येणाऱ्या परस्पर संपर्कातून कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहील, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. 

स्वॅब देऊन फिरस्ती 
उपजिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर त्याचा रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचशा शिक्षकांकडून त्याचे पालन होत नसल्याची परिस्थिती आहे. स्वॅब दिलेले अनेकजण उघड्यावर फिरतात, लग्नसमारंभात सहभागी होतात. त्यांच्याकडून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशाच बेशिस्तीमुळे शिरपूर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे स्वॅब घेतल्यानंतर निगेटिव्ह चाचणी येईपर्यंत संबंधित विलगीकरणात राहतील याचे मॉनिटरींग करणारी यंत्रणा उभारण्याचीही गरज आहे. 
  
समारंभ ठरणार माध्यम 
कार्तिकी एकादशीनंतर होणाऱ्या विवाह समारंभांची संख्या आणि नियम, दक्षता धाब्यावर बसवून मिरवणूक, जेवणावळीतील गर्दी धडकी भरवणारी आहे. अशा समारंभात बाहेरगावच्या व स्थानिक मंडळींचा आपसांतील संपर्क संसर्ग पसरवण्याची दाट शक्यता आहे. केवळ मास्क, सॅनिटायझर अशी प्राथमिक साधने या कार्यक्रमांत वापरली जातात आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला मात्र सरसकट हरताळ फासला जातो, ही बाब वारंवार दिसून आली. त्यामुळे लग्नांची तिथी जितकी मोठी तितकीच कोरोनाचा आलेख उंचावण्याची शक्यताही मोठी ठरू शकते. 

गर्दीने सोडले ताळतंत्र 
कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर अपवाद वगळता बहुतांश नागरिकांनी कोरोना निर्मूलन झाल्याचे मानून घेत खुलेपणाने व्यवहार चालवले आहेत. फळ, भाजीबाजारात सर्वाधिक दारुण परिस्थिती दिसते. विक्रेते, ग्राहक कोणीच नियम पाळण्यास तयार नाहीत. पोलिस, महसूल विभाग अधूनमधून दंडात्मक कारवाई करीत असले तरी स्वयंशिस्तीशिवाय कोरोनाचा धोका नियंत्रणात येणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com