शिल्लक चपात्‍यांचे घटांगाडीसोबतच संकलन 

सचिन पाटील
Sunday, 8 November 2020

पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे एकूण ११ घंटागाड्यामार्फत दररोज ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्यातील आठ गाड्यांद्वारे ‘गौ माता की रोटी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शिरपूर (धुळे) : येथील उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शहरात ‘गौ माता की रोटी’ या अभिनव उपक्रमाला नुकताच प्रारंभ झाला. पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे एकूण ११ घंटागाड्यामार्फत दररोज ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्यातील आठ गाड्यांद्वारे ‘गौ माता की रोटी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दैनंदिन कचरा संकलनासह घरांमधून शिल्लक चपात्याही गोळा केल्या जातात. त्यासाठी घंटागाडीसोबत स्वच्छ बादल्या दिल्या जातात. दिवसभरात जमा केलेल्या चपात्या एकत्र करून गोशाळेतील गायींसाठी पाठवल्या जातात. 

अशी सुचली संकल्पना 
शहरातील प्रभागांना भेटीप्रसंगी रस्त्यांच्या कडेला चपात्या टाकण्यात आल्याचे भूपेशभाई पटेल यांना आढळले. त्यांनी अधिक माहिती घेतल्यावर उरलेल्या चपात्या मोकाट गुरांसाठी गृहिणी टाकत असल्याचे दिसून आले. मात्र अनेकदा गुरांनी तोंड न लावल्याने चपात्या तशाच पडून कुजत असल्याचे आढळले. या प्रश्नावर तोडगा शोधताना त्यांना ‘गौ माता की रोटी’ हा उपक्रम राबविण्याची गरज लक्षात आली. 

गोशाळांना मदत 
शहर आणि परिसरात सात ते आठ गोशाळा आहेत. भाकड, अशक्त गुरांसह पोलिसांनी तस्करीच्या वाहनांतून जप्त केलेली जनावरेही या गोशाळांमध्ये सांभाळण्यासाठी दिली जातात. त्यांची देखभाल करण्यासह दैनंदिन चाऱ्याचा खर्च मोठा असतो. विशेषतः उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न आणखी बिकट होतो. या पार्श्वभूमीवर गुरांना पूरक खाद्य म्हणून पालिकेने संकलन केलेल्या चपात्यांचा आधार लाभल्याने गोशाळांना मोठी मदत होणार आहे. 
 
अन्नाची नासाडी ही खूप वेदनादायी बाब आहे. ती थांबवण्यासह गोशाळेतील गुरांना पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवीत आहोत. चपाती संकलन वाढेल त्याप्रमाणे त्यांचे वितरण विविध गोशाळांना केले जाणार आहे. नेहमीप्रमाणेच शहरवासीयांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. 
- भूपेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष, शिरपूर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur palika ghanta gadi home to home collection chapati