पंतप्रधान किसान सन्मान योजनेत लपवालपवी; हजार शेतकऱ्यांना नोटिसा

सचिन पाटील
Monday, 2 November 2020

हजारावर नोकरदार व प्राप्तिकरदात्यांनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला असून, त्यांनी नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत घेतलेल्या रकमा परत करावयाच्या आहेत. 
 

शिरपूर (धुळे) : वर्षाकाठी सहा हजारांच्या अनुदानाच्या लोभापोटी प्रशासनाची दिशाभूल करणे, नोकरदार व प्राप्तिकरदात्यांना चांगलेच महागात पडणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत लाभार्थी ठरलेल्या एक हजार १७ जणांना तहसीलदार आबा महाजन यांनी पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे. विहित मुदतीत रक्कम परत न केल्यास सक्तीच्या वसुलीसह कायदेशीर कारवाईलाही संबंधितांना तोंड द्यावे लागणार आहे. 
या योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीची प्राप्तिकर विभागाच्या यादीशी पडताळणी केल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर हा प्रकार उघडकीस आला. केंद्रामार्फत अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांना व तेथून तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या. तालुक्यातील हजारावर नोकरदार व प्राप्तिकरदात्यांनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला असून, त्यांनी नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत घेतलेल्या रकमा परत करावयाच्या आहेत. 
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेत नोकरदार, प्राप्तिकर भरणारे व महाभूधारक शेतकऱ्यांना वगळले आहे. तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी प्राप्तिकर विभागाच्या यादीसोबत तपासली असता, अनेक शेतकऱ्यांनी माहिती दडवून लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. 

असा द्यावा परतावा 
संबंधितांनी नोटीस बजावल्यापासून १५ दिवसांच्या आत रक्कम तलाठ्यांकडे तहसीलदार, शिरपूर पीएम किसान या नावाने धनादेशाच्या स्वरूपात जमा करावयाची आहे. धनादेशाच्या मागील बाजूस आपले नाव व पीएम किसान बेनिफिशरी आयडी ठळक स्वरूपात लिहावयाचा आहे. वसूलपात्र रक्कम १५ दिवसांत प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील सक्तीच्या वसुलीसंदर्भात तरतुदी व नियमांचा उपयोग करून वसुली करण्यात येईल, असा इशारा नोटिशीतून दिला आहे. 
 
नोकरदार, प्राप्तिकर भरणाऱ्यांना वगळून अन्य शेतकऱ्यांचा समावेश पीएम किसान योजनेत केला होता. आर्थिक लालसेपोटी अनेकांनी माहिती दडवून योजनेसाठी अर्ज केले. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची नावे वर्गीकृत करून वसुलीसाठी गावनिहाय यादी पाठविली आहे. नोटिशीनंतर काहींनी भरणा केला. उर्वरितांनी तत्काळ रकमा जमा करून कारवाई टाळावी. 
-आबा महाजन, तहसीलदार, शिरपूर 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur pm kisan yojna farmer notice