esakal | मालकातरच्या "मालामाल' रेशन दुकानदारावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

dhule

शासकीय धान्याची बेकायदेशीर साठवणूक अथवा वाहतूक करून कुणी काळा बाजार करत असेल तर जिल्हा प्रशासनास त्याची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवली जातील. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध प्रसंगी "मोका'सारख्या कठोर कायद्याचाही वापर केला जाईल. 
- रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे
 

मालकातरच्या "मालामाल' रेशन दुकानदारावर गुन्हा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे, ता.ः जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मालकातर (ता. शिरपूर) येथील स्वस्त धान्य दुकानात वितरित केलेल्या धान्यापेक्षा जादा धान्यसाठा आढळून आला. तो काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने रेशन दुकानदारासह तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. 
मालकातर गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. तेथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबत अनियमितता असल्याच्या तक्रारी होत्या. काल (ता.10) जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, विवेक घुगे व शिरपूरच्या पुरवठा निरीक्षक अपर्णा वडुरकर यांच्या पथकाने धाड टाकली. 

जादा धान्यसाठा आढळला 
शिरपूरच्या शासकीय गुदामातून एकूण 72.50 क्विंटल गहू दिलेला असताना प्रत्यक्षात 13.50 क्विंटल गहू जादा आढळून आला; तसेच शासकीय गोदामातून कोणत्याही योजनेंतर्गत तांदूळ दिलेला नसताना 19.00 क्विंटल तांदूळ आढळून आला. हे जादा धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ज्या घरांत धान्यसाठा होता त्या संबंधित दोन्ही घर मालकांकडे धान्य साठवणुकीबाबत कोणत्याही सक्षम प्राधिकारीची परवानगी नव्हती. स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा यांना वारंवार दूरध्वनी करूनही ते उपस्थित राहिले नाही. तसेच साठा व विक्री नोंदवहीदेखील उपलब्ध केली नाही. लाभार्थ्यांचा 35 किलोऐवजी 10 किलो धान्य दिल्याचा जबाबही होता. याप्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भामरे यांच्या फिर्यादीवरून स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पावरा व बेकायदेशीररीत्या स्वतःच्या घरात रेशनचे धान्य साठवून ठेवल्याने पदम पाडका पावरा व रवींद्र विक्रम पावरा यांच्याविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला. 

 
 

loading image