नमुन्यांऐवजी थेट आरोपींची कोरोना चाचणीसाठी रवानगी

सचिन पाटील
गुरुवार, 30 एप्रिल 2020

नमुने घेण्याऐवजी संबंधितांना थेट धुळ्याला कोरोना चाचणीसाठी पाठवून संसर्गाचा धोका ओढवून घेणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभारही यानिमित्ताने उघडकीस आला.

शिरपूर (जि.धुळे) : वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणलेल्या आरोपींचे नमुने घेण्याऐवजी त्यांना कोरोना चाचणीसाठी थेट धुळे येथे रवाना करण्याचा प्रताप शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घडवला. या बेपर्वाईमुळे पोलीस दलात संताप व्यक्त केला जात आहे.

आवर्जून वाचा - जळगाव जिल्ह्यातील उद्योगांवर माल वाहतुकीचे संकट; काय आहे कारण वाचा...
 

खो-खोचा खेळ 
येथील आरोग्य यंत्रणेतर्फे सुरू असलेल्या खो खो च्या खेळामुळे काल पोलिसांसह सात संशयितांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला. नमुने घेण्याऐवजी संबंधितांना थेट धुळ्याला कोरोना चाचणीसाठी पाठवून संसर्गाचा धोका ओढवून घेणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभारही यानिमित्ताने उघडकीस आला.

इथे नको, धुळ्याला जा 
हिंगोणी (ता.शिरपूर) येथे 24 एप्रिलच्या रात्री जमावाने केलेल्या मारहाणीत अधिकार आत्माराम पाटील या वृद्धाचा मृत्यू झाला. शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. निरीक्षक हेमंत पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सात संशयितांना ताब्यात घेतले. काल त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयितांची चाचणी करून घेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र रुग्णालयात चाचणीची सुविधा नसल्याचे सांगून त्यांना थेट धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. 

संसर्गाचा धोका 
धुळे येथे पोहचल्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांनी घडल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. केवळ नमुने पाठवून भागणार असतांना थेट संबंधित व्यक्तीला का पाठवले, शिरपूरला नमुने घेण्यासाठी किटसह आवश्यक ते सर्व साहित्य दिले आहे मग इकडे येण्याची गरज काय असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. धुळे येथे चाचणी करावयाची असल्यास संबंधितांना ऍडमिट करून घ्यावे लागते, ते आरोपी असल्याने पहाऱ्यासाठी पोलीस कर्मचारी नेमावे लागतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आल्याने पोलिसही संभ्रमात पडले. सध्याची अवस्था लक्षात घेता रुग्णालयातच संसर्ग होण्याची भीती त्यांनी वर्तवली. त्यानंतर डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित आरोपींचे शिरपूरलाच नमुने घ्यावेत असे पत्र देऊन पोलिसांना परत पाठवले. दिवसभरात हेलपाटे आणि संभाव्य संसर्गाची भीती यामुळे उद्विग्न झालेले पोलीस रात्री उशिरा शिरपूरला परतले. 

धुळ्यावरच भार का ? 
धुळे सर्वोपचार रुग्णालयाच्या अखत्यारीतील जिल्ह्यात सर्व उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे नमुने घेण्याची सुविधा दिली असेल तर थेट धुळ्याला व्यक्ती पाठवून चालढकल का केली जाते असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. स्वतःला संसर्गाचा धोका आणि जबाबदारी टाळण्याच्या प्रयत्नात सात संशयितांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur police costadi charged corona testing