प्रसूतीकळांनी विव्हळत "ती'चा "बांबूच्या झोळी'तून प्रवास... !

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

तीन किलोमीटरचे अंतर झोळीतून कापल्यानंतर तिला रूग्णवाहिकेने बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. या घटनेने मात्र पुन्हा एकदा दुर्गम आदिवासी भागातील वैद्यकीय सुविधेची गंभीर स्थिती समोर आली आहे.

शिरपूर : प्रसूतीकळांनी विव्हळत असलेल्या महिलेस बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेण्याची धक्कादायक घटना थुवाणपाणी (ता. शिरपूर) येथे घडली. तीन किलोमीटरचे अंतर झोळीतून कापल्यानंतर तिला रूग्णवाहिकेने बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. या घटनेने मात्र पुन्हा एकदा दुर्गम आदिवासी भागातील वैद्यकीय सुविधेची गंभीर स्थिती समोर आली आहे. आणखी किती दिवस आम्ही "बांबूची झोळी'चा उपयोग करून जीव वाचवायचे असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या थुवानपाणी गावातील वसंता रविंद्र पावरा (वय-22) या गरोदर महिलेस काल सायंकाळी प्रसूतीवेदना होऊ लागल्या. मात्र गुऱ्हाळपाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कुटुंबियांनी बांबूला साडी बांधून झोळी तयार केली. झोळीतून तिला गुऱ्हाळपाणी गावापर्यंत नेण्यात आले. तेथील आशा कार्यकर्तीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागविली. वसंता पावराला बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे तिची सुखरूप प्रसूती झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या भागासाठी रस्ता आणि आरोग्य उपकेंद्र द्यावे अशी मागणी ग्रामस्थ गेल्या आठ वर्षापासून करत आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या "सीईओ' वान्मती सी. यांच्या दौऱ्यातही ग्रामस्थांनी त्याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, अद्याप त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

थुवानपाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गुऱ्हाळपाणी येथून संबंधित महिलेस 108 रुग्णवाहिकेने बोराडी केंद्रात दाखल करण्यात आले. वकवाड केंद्राची व्हॅन नादुरूस्त असून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. आशा कार्यकर्तीने सूचित केल्यावर बोराडीहून वेळेत रूग्णवाहिका पोहचली.
-डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी, शिरपूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur pregnant women no ambulance Travel through bamboo bag