लॉकरची चावी बनविण्यासाठी बोलावले; चावी नाही उलट लावला चुना

सचिन पाटील
Friday, 2 October 2020

लॉकर उघडण्यासाठी त्यांनी एका चावीवाल्याला बोलावले. सुमारे १६ ते १९ वर्षादरम्यान वय असलेल्या चावीवाल्याने काहीवेळ लॉकर उघडण्याची खटपट केली. 

शिरपूर (धुळे) : लॉकर उघडत नव्हते म्हणून त्याने पैसे मोजून चावीवाल्याला बोलावले. काहीवेळ खटपट केल्यानंतर चावीवाला दुसरी चावी घेऊन येतो असे सांगून गेला तो परतलाच नाही. दोन आठवड्यांनी लॉकरच्या छिद्रात कापसाचा बोळा पाहून मालकाला शंका आली. लॉकर उघडल्यावर चांदीचे ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे आढळले. 

न्यू बोराडी (ता. शिरपूर) येथील शिकाऱ्या अनाऱ्या पावरा (वय ३९) यांच्यासोबत हा प्रकार घडला. त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरची चावी हरवली होती. लॉकरमध्ये चांदीचे पिढीजात दागिने ठेवले होते. त्यामुळे १७ सप्टेंबरला लॉकर उघडण्यासाठी त्यांनी एका चावीवाल्याला बोलावले. सुमारे १६ ते १९ वर्षादरम्यान वय असलेल्या चावीवाल्याने काहीवेळ लॉकर उघडण्याची खटपट केली. 

दुसरी चावी घेवून येण्याचे सांगत गेला
माझा भाऊ लॉकर उघडण्यात अधिक तरबेज असून तो येत आहे का ते पाहण्यासाठी त्याने शिकाऱ्या पावरा यांना बाहेर पाठवले. काही वेळाने लॉकर उघडत नाही, मी दुसरी चावी घेऊन येतो असे सांगून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहूनही तो न परतल्याने शिकाऱ्या पावरा लॉकरचा नाद सोडून पुन्हा दुसऱ्या कामांमध्ये गढून गेले. एक ऑक्टोबरला ते कपाट उघडून पाहत असताना लॉकरच्या लॅचमध्ये काहीतरी अडकल्यासारखे दिसले. त्यांनी काडीने स्वच्छता केल्यावर कापूस अडकवल्याचे आढळले. त्यांनी खटपट केल्यावर लॉकर सहजच उघडले. त्यातील बांगड्या, कडे व आदिवासी परंपरेतील आहडी असे एकूण ७४ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने जागेवर नसल्याचे आढळले. चावीवाल्याने गंडा घातल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी लागलीच सांगवी पोलिस ठाणे गाठले. अनोळखी चावीवाल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार फुलपगारे तपास करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur shop locker key worker but jwellary robbery